Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सामाजिक संस्थां आणि राजकीय पक्षांच्या सभेला रोहेकरांचा प्रतिसाद!

अवैध धंदे आणि आहारी गेलेल्या तरुणाई बद्दल बैठकीत चिंता व्यक्त...

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

रोहा, 5 ऑगस्ट 2023 : तालुक्यातील अवैध धंदे आणि वाममार्गाला लागलेली तरुण पिढी याविषयावर सामाजिक संस्थां आणि राजकीय पक्षांची संयुक्त बैठक शुक्रवारी सायंकाळी रोहा प्रेस क्लब तर्फे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली, अवैध धंदे आणि त्यांच्या आहारी गेलेल्या तरुणाई बद्दल या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली.

रोहा तालुक्यातिल युवा पिढी, कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांच्या आहारी गेलेला आहे. यागोष्टीला प्रतिबंध घालण्यासाठी तसेच वाममार्गाला चाललेल्या युवा पिढीला रोखण्यासाठी रोहयातील ज्येष्ठ वकील ऍड. सुनिल सानप यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर सिटीझन फोरमचे निमंत्रक आप्पा देशमुख, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख ऍड. मनोजकुमार शिंदे, भाजपाचे जिल्हा युवक अध्यक्ष अमित घाग, महिला प्रतिनिधी दीपिका चिपळूणकर, डॉ. फरीद चिमावकर, ज्येष्ठ पत्रकार दिलीप वडके, मिलिंद अष्टीवकर, प्रेस क्लबचे अध्यक्ष राजेंद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला मिलिंद अष्टीवकर यांनी ही बैठक घेण्यामागील भूमिका मांडताना सुरुवाती पासूनचे घटनाक्रम सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अवैध धंद्यां विषयी पोलिसांना निवेदन दिल्यानंतर प्रेस क्लबने सातत्याने त्याचा पाठपुरावा केलेला आहे व सक्षमपणे तो विषय लावून धरलेला आहे. परंतु अवैध धंद्यांच्या आहारी गेलेला तरुण, नोकरदार वर्ग, शाळेय विद्यार्थी आदींच्या त्रस्त कुटुंबियांकडून समोर आलेला वास्तव अतिशय भयानक आहे, त्याची माहिती या बैठकीत देताना याविषयी कुठेतरी पायबंद घालण्यासाठी, भविष्यात रोहा तालुक्यात असे काही अघटीत व दुर्दैवी प्रसंग घडू नयेत, असंख्य कुटुंब, अनेकांचे संसार त्यामुळे उद्धवस्त होऊ नयेत, यासाठी बैठकीचे आयोजन केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यागोष्टीला पायबंद घालण्यासाठी एक कृती समिती स्थापन करून सर्वांनी एकत्रितपणे काही प्रयत्न, काही उपाययोजना करण्याची गरज आहे. या प्रयत्नांतून तालुक्यात जनजागृती माध्यमातून लोक चळवळ उभी राहिल्यास वाममार्गाला लागलेल्या तरुण पिढीला योग्य दिशा मिळू शकेल. त्यांच्या त्रस्त कुटूंबियांना या प्रयत्नांमुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थितांमधून विष्णू लोखंडे, सूर्यकांत मोरे, हर्षद साळवी, रोशन चाफेकर, श्वेता पाटील, रोशन देशमुख आदींनी मनोगत व्यक्त केले. तर ऍड. मनोजकुमार शिंदे, अमित घाग, दीपिका चिपळूणकर, डॉ. फरीद चिमावकर आदी मान्यवरांनी यावेळी मतप्रदर्शन केले. शहरात अवैध धंदे बंद झाल्यास त्यामध्ये काम करणारे काही तरुण हे बेरोजगार होणार आहेत, या तरुणांना औद्योगिक वसाहतीत रोजगार मिळण्यासाठी काहीतरी प्रयत्न झाले पाहिजेत अशी बाजू महेंद्र दिवेकर, महेश कोल्हटकर यांनी यावेळी मांडली असता कृती समितीही त्यासाठी प्रयत्नशील राहील असे सांगण्यात आले. यासभेचे अध्यक्ष ॲड सुनील सानप यांनी मटका, जुगार, ऑनलाईन लॉटरी, रमी बंद व्हायलाच पाहिजे. यामुळे काही संसार उध्वस्त होत आहेत. आत्महत्या होत आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

रोहा प्रेस क्लब ने सामाजिक समस्या मांडली आहे. यामध्ये कुणीतरी बेरोजगार व्हावं असं वाटत नाही, यात हेतू चांगला आहे. समाजामध्ये असं काहीतरी होतंय यावर सोल्युशन काढलंच पाहिजे. रोह्यात पत्रकार जागृत असल्याने समाज सुधारण्याचे काम होत आहे. अवैध व्यवसायाशी संबंधित तरुणांचं म्हणणं आहे, रोजगार नाही, शिक्षण असून रोजगार नाही. मुळात रोजगाराची उपलब्धता कमी आहे. या सर्व भावनिक आणि सामाजिक समस्या आहेत. रोहा एमआयडीसीमध्ये स्थानिकांना रोजगार नाही.

कारखाने गुजरातला जात आहेत, गुजरातला कारखाने कसे गेले? आपण जाब विचारला का? स्थानिक आमदार, स्थानिक खासदार यांना जाब विचारला का ? आपापसात वाद करण्यापेक्षा जागरूक राहिले पाहिजे. आंदोलन झाली पाहिजेत. जे तरुण अवैध व्यवसायाकडे वळले आहेत त्यांचं कौन्सिलिंग व्हायला हवे. समाज चांगल्या मार्गाला जायला हवा. आताचं राजकारण सुद्धा अवैध आहे, ते सुद्धा सुधारले पाहिजे. आपला मतदानाचा हक्क बजावताना योग्य रीतीने काम करा. ॲड सुनील सानप यांनी सामाजिक मुद्द्याला हात घालताना रोहेकरांच्या विचारांचे आदानप्रदान केले त्याबद्दल रोहा प्रेस क्लबचे अभिनंदन केले. या बैठकीला सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, पक्षीय नेतेमंडळी, सामाजिक कार्यकर्ते, आदींसह सर्व स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली होती. सुखद राणे यांनी सूत्रसंचालन केले, रोहा प्रेस क्लबचे पदाधिकारी आणि सदस्य यांनी परिश्रम घेतले.

हे पण वाचा :-

Comments are closed.