Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दौंड शटल तातडीने सुरू करा – खा. सुळे यांची रेल्वेकडे मागणी

बारामती लोकसभा मतदार संघातील रेल्वेच्या विविध समस्यांवर बैठकीत चर्चा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे डेस्क, दि. ११ जानेवारी: कोरोनामुळे दौंड-पुणे शटल बंद करण्यात आली आहे. यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या हजारो कामगार आणि अन्य नागरीकांची अडचण झाली आहे. त्यामुळे ही सेवा तातडीने सुरु करावी या मागणीबरोबवरच बारामती लोकसभा मतदारसंघातील रेल्वेच्या विविध कामांसाठी पुणे येथे रेल्वेच्या विभागीय अधिकारी रेणू शर्मा यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे यांनी चर्चा केली. प्रवाशांची सुरक्षा व सुविधा आदी मुद्यांवर यावेळी प्रामुख्याने चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजीत करण्यात आली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती लोकसभा मतदार संघाचे समन्वयक प्रवीण शिंदे, पुणे जिल्हा अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष सोहेल खान, पुरंदर तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे, दौंड-पुणे-दौंड रेल्वे प्रवासी संघाचे विकास देशपांडे आदी पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते. पुणे दौंड-पुणे शटल बंद असल्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या नागरीकांची मोठी अडचण होत आहे. त्यामुळे ही सेवा तातडीने सुरु करावी, अशी मागणी या बैठकीत केली. याशिवाय या मार्गावर अत्यावश्यक सेवा अंतर्गत येणाऱ्या सरकारी व निमसरकारी कर्मचारी,बँक कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, ब्लड बँक कर्मचारी, पोलीस आदींना प्रवासाची मुभा देण्यात यावी हा मुद्दा यावेळी मांडला.
याशिवाय पुणे ते बारामती दरम्यान ‘मेमू’ (मेनलाईन इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट ट्रेन) सुरु करण्यात यावी. ही प्रवाशांची मागणी रेल्वे खात्याकडे मांडली. ही गाडी सुरु झाल्यास प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्यास मदत होईल. याशिवाय प्रदूषणही कमी करता येऊ शकेल. पुणे ते दौंड दरम्यानच्या मार्गावरील फलाटांची उंची वाढविण्यात आली असून या मार्गाचे विद्युतीकरण देखील पुर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ‘मेमू’ लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी यावेळी केली.
बहुतांश सुपरफास्ट रेल्वेगाड्यांना दौंड स्थानकावरुन जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नागरीकांच्या सोयीसाठीपुणे-मुंबई प्रगती (१२१२६ / १२१२५) एक्स्प्रेसला दौंड पर्यंत प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणीही या बैठकीत सुळे यांनी केली. पुणे – सिकंदराबाद, चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस, हमसफर , संपर्क क्रांती या गाड्यांना दौंड येथे थांबा द्यावा, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

नीरा,पुरंदर येथील मुस्लिम बांधवांना प्रार्थना स्थळापर्यंत जाण्यासाठी जीव धोक्यात घालून रुळ ओलांडावा लागतो. याठिकाणी रेल्वेरुळाचे काम होणार असून येथे या कामासोबतच नागरिकांच्या सोयीसाठी भुयारी मार्गाचे काम करावे अशी सुचना केली. नीरा स्थानकावर हजरत निजामुद्दीन-गोवा या गाडीला थांबा देण्यात यावा, अशीही मागणी यावेळी केली. जेजुरी स्थानकाचे विस्तारीकरण सुरु असताना प्राथमिक शाळा व अंगणवाडीची इमारत पाडण्यात आली होती. ही शाळा व अंगणवाडीसाठी रेल्वेने पर्यायी जागा उपलब्ध करावी अशीही मागणी यावेळी मांडली.
जेजुरी-नीरा मार्गावरील सुकलवाडी, रेल्वे गेट क्रमांक २५ येथे भुयारी मार्ग बांधावा अशी मागणीही यावेळी केली. याशिवाय सुकलवाडी येथे रेल्वे पुलाखाली पाणी साठू नये याची दक्षता घ्यावी ही सुचनाही केली. जेजुरी स्थानकावरील पादचारी उड्डाण पुलाचे विस्तारीकरण, रेल्वे स्थानकात महिलांसाठी वेटींग रुम सुरु करून तेथे महिला आरपीएफ अधिकारी तैनात करण्यात यावेत अशीही मागणी यावेळी केली. ढालेवाडी रेल्वे गेट ते जेजुरी स्थानक दरम्यान सर्व्हिस रोड तयार करणे आणि कोळविहिरे येथे उड्डाणपूल बांधावा या मागण्या यावेळी मांडल्या. चेन्नई एक्सप्रेसचा भिगवण रेल्वे स्थानक हा थांबा रद्द करण्यात येऊ नये, भिगवण परिसरातील नागरीकांना हे स्टेशन अतिशय सोयीचे असून येथे हैद्राबाद -मुंबई एक्स्प्रेस गाडीला थांबा देण्यात यावा, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.