संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर अखेर मुख्यमंत्र्यांची सही, राजीनामा राज्यपालांकडे पाठवणार
मुंबई डेस्क, दि. ४ मार्च: पूजा चव्हाण हिच्या आत्महत्याप्रकरणामुळे अडचणीत आलेले राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना आमदार संजय राठोड यांच्या गच्छंतीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. गेल्याच आठवड्यात संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी सही केली असून तो आजच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून गच्छंती होणार आहे.
अनेक दिवस उलटूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे न पाठवल्याने विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून टीका करण्यात आली होती. ठोडांचा राजीनामा फक्त दिखाव्यापुरता आहे का? राठोडांचा राजीनामा शिवसेना भवन किंवा मातोश्रीत फ्रेम करून ठेवला आहे का? असा खोचक सवाल भाजप आमदार संजय कुटे यांनी उपस्थित केला होता.
राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा अद्यापही राज्यपालांकडे पाठवलेला नाही. त्यामुळे राठोड हे अजूनही वनमंत्री आहेत. जोपर्यंत राठोडांचा राजीनामा राज्यपाल मंजूर करत नाहीत, तोपर्यंत राठोडांनी राजीनामा दिला असं म्हणता येणार नाही, असं सांगतानाच राजीनामा राठोडांकडे पाठवण्यासाठी इतके दिवस का लागत आहेत, असेही त्यांनी विचारले होते.
Comments are closed.