Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सरपंच अडकला एसीबीच्या जाळ्यात.

चामोर्शी तालुक्यातील खळबळजनक घटना...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 2, सप्टेंबर :- आजच्या परिस्थितीत भ्रष्टाचार गावपातळीपर्यंत पसरला आहे. कागदावर वजन ठेवल्याशिवाय कागद पुढे सरकतच नाही. गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल आणि दुर्गम जिल्ह्यात भ्रष्टाचाराची कीड पसरल्याची एक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याबाबतची हकीगत अशी की,

गडचिरोली जिल्हयातील चामोर्शी तालुक्यातील विक्रमपूर येथील सरपंच घरकुल योजनेत नाव नोंदवून घरकुलाचा लाभ मिळवून देण्याकरिता ९ हजारांची लाच स्विकारतांना एसीबीच्या जाळयात अडकला आहे. श्रीकांत सत्यनारायण ओल्लालवार (४६) रा. चामोर्शी असे लाचखोर सरपंचाचे नाव आहे. सदर कारवाईने ग्रामपंचायत प्रशासनात एकच खळबळ उडाली असून लाचखोरीची लागण आता गावपातळीवर पोहचली आहे. एका सरपंचाने आपल्याच गावातील एका घरकुल योजनेसाठी पात्र असणाऱ्या व्यक्तीकडून लाच मागितली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्राप्त माहितीनुसार, तक्रारदाराचे घरकुल योजनेत नाव नोंदवून घरकुलाचा लाभ मिळवून देण्याकरिता सरपंच श्रीकांत सत्यनारायण ओल्लालवार यांनी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र तक्रारदार यांना लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा करून सापळा रचला असता चामोर्शी येथील राहत्या घरी तडजोडीअंती ९ हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी पोलीस स्टेशन चामोर्शी येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई ला.प्र.वि गडचिरोलीचे पोनि शिवाजी रोठोड, पोनि श्रीधर भोसले, पोहवा नथ्थु धोटे, पोना राजेश पदमगिरवार, पोना श्रीनिवास संगोजी, पोशि संदीप उडाण, मपोशि ज्योत्सना वसाके, चापोहवा तुळशिराम नवघरे यांनी केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यानिमित्ताने घरकुल योजनेत फार मोठा भ्रष्टाचार होत आहे हे आता जनतेसमोर येऊ लागले आहे. घरकुल योजनेची कसून चौकशी केल्यास पात्र नसलेल्या व्यक्तीना घरे मिळाली असल्याचे निदर्शनास येईल. एक मोठा भ्रष्टाचार उघडकीस येऊ शकतो. प्रशासनाने याप्रकरणी विशेष लक्ष घालून घरकुल योजनेचा पर्दाफाश करावा. अशी जनतेतून मागणी होत आहे.

हे देखील वाचा :-

‘जिओ स्टुडिओज’ च्या ‘एक दोन तीन चार’ या नवीन चित्रपटाची घोषणा !

Comments are closed.