Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. ३१ मार्च: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ‘स्मार्ट कार्ड’  योजनेला दि. ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सध्याची राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन, या योजनेला दि. ३० सप्टेंबर,२०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी दिली.

एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २९ विविध सामाजिक घटकांना ३३ टक्के पासून १०० टक्केपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देण्यात येते.  या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेल्या ‘स्मार्ट कार्ड’  काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक प्रवाशांना आगारात येऊन स्मार्टकार्ड घेणे शक्य नसल्याने तसेच त्यासंबंधीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्याने या योजनेला पुढील सहा महिने म्हणजेच दि.३० सप्टेंबर,२०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या भागात एसटी बसेस सुरू असतील त्या भागांमध्ये प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलत लागू राहणार आहे असे परिवहन मंत्री श्री. परब यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.