काकडवेली ग्रामवासियांनी लावलेले आरोप बिनबुडाचे
-दुधमाळा व फासीटोला वासियांची पत्रकार परिषदेतून माहिती
गडचिरोली, दि. २३ जानेवारी : काकडवेली येथील काही ग्रामस्थांनी दुधमाळा येथील रहिवासी व मुक्तिपथ धानोरा तालुका प्रेरक अक्षय पेद्दीवार यांच्यावर ग्रामपंचायत निवडणुकीत दारू वाटपाचे लावलेले आरोप बिनबुडाचे आहेत. अशी माहिती दुधमाळा व फासीटोला येथील ग्रामवासियांनी २२ जानेवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली आहे.
पत्रकार परिषदेत माहिती देताना दोन्ही गावातील गावकरी म्हणाले, मुक्तीपथ तालुका प्रेरकाने मतदानाच्या दिवशी दुधमाळा येथील एका घरी मतदारांना दारूचे वाटप केले असल्याचे आरोप बिनबुडाचे आहे. निवडणुकीदरम्यान दुधमाळा येथे कोणत्याही प्रकारचे दारूचे वाटप झाले नाही. फक्त मतदारांना मतदान क्रमांक व त्यांचे नावाचे चिठ्या देण्यात येत होते. त्यामुळे काही नागरिकांनी गैरसमज करून दारू वाटप करीत असल्याचा आरोप केला होता. तो आरोप खोटा असून राजकीय द्वेषातून करण्यात आला आहे. काकडवेली येथील दारूविक्री बंदीकरिता मुक्तीपथ तालुका प्रेरक अक्षय पेद्दीवार व त्यांच्या चमूने सहकार्य केले होते.
दुधमाळा ग्रामपंचायत अंतर्गत काकडवेली, फासिटोला या गावांचा समावेश होतो. दुधमाळा येथे चार सदस्य व काकडवेली येथे तीन सदस्य आहेत. काकडवेली येथील दोन सदस्य बिनविरोध निवडणून आले तर एका जागेकरिता मतदान झाले. त्यामध्ये मंदा नरेंद्र उईके हे उमेदवार विजयी झाले. त्या जागेकरिता जिप पदाधिकाऱ्यांनी काकडवेली येथे जाऊन प्रचार केला होता. परंतु निवडणुकीत पराभव होणार असल्याचे दिसून येताच विरोधकांनी अक्षय पेद्दीवार व एका पॅनलवर दारू वाटप करीत असल्याचे खोटे आरोप लावले. अशी माहिती दुधमाळा व फासीटोला ग्रामवासियांनी पत्रकार परिषदेतून दिली.
पत्रकार परिषदेला तुळशीराम कोकोडे, शंकर नैताम, हरिश्चंद्र मोहुर्ले, राजेंद्र मेश्राम, सचिन गुरनुले, महादेव नैताम, मंदा उईके, सुनंदा तुलावी, सुनंदा निकुरे, सुखदेव कोकोडे, राकेश बावनथडे, प्रवीण गावतुरे, रोशन कोकोडे, अभिषेक मुत्तेलवार, सुरेश कुमोटी, हरिदास हलामी, कान्हू नरोटे, चिन्नू कुमोटी, पंकज कोरेटी यांच्यासह दोन्ही गावातील नागरिक उपस्थित होते.
Comments are closed.