Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याबद्दल भगिनींनी मानले मुख्यमंत्री भाऊरायाचे आभार

भगिनींनी बांधल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राखी

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई २९ – राज्याच्या अर्थसंकल्पात महिला- भगिनींसाठी अनेक निर्णय घेऊन त्यांना दिलासा दिल्याबद्दल विविध क्षेत्रातील महिला- भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओवाळून राखी बांधत त्यांचे आभार मानले. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी 1 जुलैपासून करत असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याना अनोखी ओवाळणी दिली.

विधानभवनाच्या प्रांगणात आज विविध क्षेत्रातील महिला भगिनी एकत्र जमल्या होत्या. विधिमंडळात काल सादर झालेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक निर्णय घेण्यात आले. या निर्णयामुळे राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळाल्याने त्यांनी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांना ओवाळून राखी बांधून त्यांचे आभार मानले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अर्थसंकल्पात राज्यातील महिला- भगिनींना दिलासा देणारे अनेक निर्णय आम्ही घेतले आहेत. मुख्यमंत्री माझी बहिण योजनेचा शासन निर्णय देखील तातडीने काढण्यात आला असून त्याचा लाभ येत्या 1 जुलैपासून भगिनींना देण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे राज्यातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत. या निर्णयाचा फायदा अडीच कोटींहुन जास्त महिलांना होणार आहे.

महिलांना वर्षातून 3 सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाही सुरू करण्यात येणार आहे. तसेच 25 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. बचतगटांतील महिलांचे खेळते भांडवल 15 हजारावरून वाढवून 30 हजार केले आहे. मुलींना उच्च शिक्षणापर्यंतचे शिक्षण मोफत देण्याचा, 10 हजार महिलाना पिंक रिक्षांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महिलांना मोफत प्रवास, 50 टक्क्यांपर्यंत मोफत एसटी प्रवास यापूर्वीच दिलेला आहे, राज्यातील सर्व माता-भगिनींच्या पाठीशी त्यांचा मुख्यमंत्री भाऊराया म्हणून नेहमी पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. राखी बांधल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्व भगिनींचे आभार मानले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी मंत्री दादाजी भुसे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार नरेंद्र भोंडेकर आणि विविध क्षेत्रातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.