Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ईव्हीएमची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली,19 मार्च – लोकसभा निवडणुकीकरिता जिल्ह्यातील मतदान केंद्रावर वितरीत करावयाच्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट या मतदान यंत्रांची प्रथम सरमिसळीकरणाची (फर्स्ट रॅण्डमायझेशन) प्रक्रिया जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांच्या हस्ते व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसमोर आज पूर्ण करण्यात आली. यातून कोणते ईव्हीएम मशिन कोणत्या मतदारसंघात जाणार, हे निश्‍चित करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात ईव्हीएम सरमिसळ प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे पूर्ण करण्यात आली. यावेळी सहायक जिल्हाधिकारी ओमकार पवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, मतदान यंत्र व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी विवेक सोळंके, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी एस.आर.टेंभूर्णे तसेच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी सर्वश्री हेमंत जंगेवार, दत्तात्रय खरवडे, प्रकाश गेडाम, सुनिल चडगुलवार, अनुप कोहळे, वासुदेव शेडमागे आदी उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगातर्फे विकसित संगणक प्रणालीमध्ये सर्व प्रकारच्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटसची नोंद घेऊन मतदारसंघनिहाय वितरित करण्यात येते. जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्राच्या संख्येपेक्षा बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट यंत्रे हे २० व ३० टक्के अधिक प्रमाणात संबंधित मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना वितरित करण्यात येत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यातील एकूण तीन विधानसभा मतदारसंघ आरमोरी येथे 302, गडचिरोली 356 व अहेरी येथे 292 मतदान केंद्र आहेत. या एकूण 950 मतदार केंद्रांकरिता 2502 बॅलेट युनिट, 1320 कंट्रोल युनिट व 1348 व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध करण्यात आले आहेत. निवडणूक मतदान यंत्र वितरीत करतांना 20 टक्के कंट्रोल युनिट व 30 टक्के व्हीव्हीपॅट मशीन अतिरिक्त देण्यात आल्या आहेत.

यानंतर संबंधीत विधानसभा मतदार क्षेत्रात कोणत्या मतदान केंद्रावर कोणते मतदान यंत्र जाईल, हे निश्‍चित करण्यासाठी पुन्हा एकदा मतदान यंत्रांच्या सरमिसळीची प्रक्रिया पार पाडेल, अशी माहिती यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना दिली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.