Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सोमवारपासून ठुणे यात्रौत्सवास आरंभ, चार दशकांची परंपरा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

शहापूर : संत गोरा कुंभार यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या चार शतकांचा वैभवशाली इतिहास लाभलेल्या व संत गोरा कुंभार यांची भक्तीपरंपरा जोपासणा-या शहापूर तालुक्यातील ठुणे येथील विठ्ठल-रखुमाई यात्रेला सोमवारी 2 जानेवारीला सुरवात होत आहे.ठुणे यात्रेचे हे 414 वे वर्ष असून हजारो विठ्ठलभक्तांच्या स्वागतासाठी देवस्थान ट्रस्टने जय्यत तयारी केली आहे.

ठुण्याची विठ्ठलयात्रा ही शहापूर-मुरबाडसाठी श्रद्धा आणि उत्सवाचे प्रतिक मानली जाते.संत गोरा कुंभार यांच्या वारसांचे गाव असलेल्या शहापूर तालुक्यातील ठुणे गावात 414 वर्षांपूर्वी गोरोबांच्या वंशजांनी विठ्ठल-रखुमाई मूर्तीची स्थापना केली होती. तेव्हापासून दरवर्षी पौष महिन्यातील पुत्रदा एकादशीच्या दिवशी भव्य ग्रामदिंडी काढून यात्रौत्सव साजरा केला जातो.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पूर्वी ही यात्रा 15 दिवस चालत असे.पुत्रप्राप्तीसाठी येथील विठ्ठलाला साकडे घातल्यास पुत्रप्राप्ती होते अशी भाविकांची श्रद्धा असल्याने नवस बोलण्यासाठी नवविवाहित भाविक दांम्पत्ये येथे येतात व पुत्रप्राप्तीनंतर बाळाला केळी व गुळामध्ये जोखण्याचा रिवाजही पाळतात. ठुण्यातील या विठ्ठल-रखुमाई यात्रेनिमीत्त सोमवार (दि.2) ते बुधवार (दि.4) असे तीन दिवस अभिषेक, हरिपाठ, भजन, किर्तन व पालखी अशा अनेकविध अध्यात्मिक तथा पारमार्थिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पंढरपूरच्या विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान जसा मुख्यमंत्र्यांना असतो तसा ठुण्यातील महापूजेचा मान शहापूरच्या विद्यमान आमदारांना दिला जातो. त्यानुसार आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते महापूजा झाल्यानंतर पुत्रदा एकादशीच्या अभिषेकांनी यात्रौत्सवाला सुरुवात होणार आहे. कै. गणू आबा वेखंडे यांच्या सहकार्याने ब्रह्मलीन योगी रिधिनाथ बाबा , विश्वनाथ , फुलनाथ , कोमालनाथजी महाराज यांच्या आशीर्वादाने ह भ प कमलाकर विशे यांच्या मार्गदर्शनाने सदर यात्रा संपन्न होत असून यात्रेच्या निमित्ताने ठुण्यात कपडे, भांडी, किराणामाल, मिठाई,खेळणी,प्लास्टिकच्या वस्तू,महिलांची आभूषणे,पूजेचे सामान इत्यादींची दुकाने लागली असून गावातील प्रत्येक घर पाहुण्या-रावळ्यांनी भरुन गेलेले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी ह.भ.प.ज्ञानेश्वर दौंडकर ,किशोरीताई गिरी व कृष्णा कामातकर यांचा कीर्तन सोहळा रंगणार असून रिधीनाथ भजनी मंडळ ,आम्ही कलेचे दास , मातृ पितृ देवो भव या भजनी मंडळांचे भजन होणार आहे. बुधवारी पांडूरंगाच्या पादुकांची भव्य मिरवणूक काढून दहिहंडी व विडादानाने यात्रेची सांगता केली जाणार असल्याची माहिती श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान ट्रस्ट ,ठुणेच्या पदाधिका-यांनी दिली.येणा-या सर्व भाविकांसाठी देवस्थान ट्रस्ट व दानशूर भक्तांच्या वतीने महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

 

Comments are closed.