Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यातील उदयनगर बांग्ला प्राथमिक शाळेची परसबाग राज्यातून प्रथम

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह कडून अभिनंदन

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व शाळांमधून परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरीता घेण्यात आलेल्या परसबाग स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याच्या मुलचेरा तालुक्यातील उदयनगर बांग्ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परसबागेला राज्यातून प्रथम क्रमांक मिळाला आहे. याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व सर्व संबंधीतांचे अभिनंदन केले असून जिल्ह्यातील कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी इतर सर्वच शाळांनी आपल्या शाळांमध्ये परसबागा निर्माण करून त्याद्वारे विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे.
केंद्र शासनाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबागा निर्माण करुन सदर
परसबागांमधून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश १५ ऑक्टोबर, २०१९ रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिले आहेत. त्याअनुषंगाने शाळेच्या परसबागेत पिकवलेला भाजीपाला, फळे इत्यादींचा समावेश शालेय पोषण आहारात करुन विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे. परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण होवून त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळणे, ताज्या भाजीपाल्याचा समावेश पोषण आहारात होवून विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार उपलब्ध होणे असे विविध चांगले हेतू या उपक्रमामुळे साध्य होत आहेत.

शालेय परसबाग स्पर्धेकरिता तालुकास्तरावरील परसबागांचे मूल्यांकन करण्यात येऊन प्रत्येक जिल्ह्यांतून एक परसबाग राज्यस्तरीय मूल्यांकनास पात्र ठरलेली होती. अशा सर्व जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाच्या परसबागेचे परिक्षण पूर्ण करण्यात येवून निर्धारित निकषांच्या आधारे राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय-दोन, तृतीय आणि प्रोत्साहनपर तीन अशा शाळांची निवड करण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यात प्रथम क्रमांक गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्याच्या जिल्हा परिषद बांग्ला प्राथमिक शाळा उदयनगर ला घोषित करण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी आणि नाशिकच्या त्रंबकेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवाळी या दोन्ही शाळांना द्वितीय क्रमांक, सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबडपाल तृतीय क्रमांक तर प्रोत्साहनपर म्हणून वर्धेच्या आष्टी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंगापूर, कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील विद्यामंदीर मळवी आण‍ि बीडच्या पाटोदा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झरेवाडी या शााळांना पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. उत्कृष्ट परसबाग स्पर्धेकरिता निवड करण्यात आलेल्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांचा विशेष सन्मान रविवार २९ सप्टेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.