Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाडा तालुक्यातील आबिटघर उपकेंद्राचे, प्राथमिक आरोग्य केंद्र होणे गरजेचे- संदेश ढोणे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पालघर/वाडा 27, डिसेंबर :- पालघर जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती श्री. संदेश ढोणे यांनी आबिटघर कांबारे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व कर्मचारी निवासी इमारतीसाठी प्रस्तावित असलेल्या जागेची आज पाहणी केली. वाडा तालुक्यातील आबिटघर कांबारे हा ग्रामीण भाग असून येथे औद्योगिक वसाहत देखील मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या भागातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
आबिटघर येथे उपकेंद्र आहे परंतु या गावाची लोकसंख्या विचारात घेता प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरात लवकर होणे गरजेचे आहे या हेतूने आरोग्य समिती सभापती संदेश ढोणे यांनी प्रस्तावित असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीची व कर्मचारी निवासस्थानाच्या जागेची पाहणी केली. १७ जानेवारी २०१३ साली ही इमारत मंजूर झाली असून सदरची जागा जमीन मालक देण्यास तयार आहे, परंतु अद्याप ही जागा जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या नावावर वर्ग करण्यात आली नसून या प्रक्रिये बाबतची सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली. तसेच संबंधित मार्गदर्शन पर सूचना यावेळी सभापती ढोणे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी आबिटघर उपकेंद्राची पाहणी केली असता दरमहा चार ते पाच प्रसूती या उपकेंद्रात होत असतात.याबद्दल तेथील परिचारिका, मदतनीस व इतर कर्मचारी यांचे कौतूक सभापती ढोणे यांनी केले. परंतु भागातील गरोदर माता तसेच रुग्णांना उपचारासाठी खानिवली प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा वाडा ग्रामीण रुग्णालय येथे जावे लागते तसेच दळणवळणाच्या दृष्टीने गैरसोय होत असल्याने अनेकदा खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. जे ग्रामीण भागातील गरीब जनतेला परवडणारे नाही त्यामुळे लवकरात लवकर आबिटघर प्राथमिक आरोग्य केंद्र तयार होणे गरजेचे असून येथील जनतेचा आरोग्याचा मूळ प्रश्न सुटेल असे प्रतिपादन संदेश ढोणे यांनी यावेळी केले.

यादरम्यान जिल्हा परिषद सदस्य भक्ती वलटे, उपसभापती वाडा पंचायत समिती जगदीश पाटील, ग्रा.पं. सदस्य भरत जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य दिव्या मस्कर, तालुका आरोग्य अधिकारी वाडा डॉ मिलिंद चव्हाण व इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

Comments are closed.