Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चौकशी होण्यापूर्वीच सरकारला पोलीस बदल्याबाबत स्पष्टीकरण देण्याची घाई का झाली आहे- प्रविण दरेकरांचा सवाल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २५ मार्च – फोन टॅपिंग प्रकरणामुळे केंद्रस्थानी असलेल्या IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांनी अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांना भाजपसोबत राहण्यासाठी धमकावले असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यांचे हे विधान हास्यास्पद आणि बालिशपणाचं असून आमदारांचे अवमूल्यन केल्यासारखं आहे, अशी भूमिका विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केली आहे.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बदली रॅकेटची सर्व माहिती केंद्रीय सचिवांना दिली आहे, सीबीआय चौकशीची मागणी सुद्धा केली आहे. सत्य समोर येईलच. पण मुख्यमंत्री कोणतीही भूमिका घेताना दिसून येत नाही, जितेंद्र आव्हाड यांच्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे. सत्य स्थिती चौकशीअंती बाहेर येईलच, परंतु राज्यसरकारला पोलीस बदल्याबाबत स्पष्टीकरण देण्याची घाई का लागली आहे ? घाईघाईने स्पष्टीकरण येत असल्यामुळे राज्यसरकारचा सर्व गोष्टीत समावेश तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित करून सरकारला मिरची झोंबली असावी, असा टोला दरेकर यांनी लगावला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोणताही आमदार किंवा नेता अधिकाऱ्याच्या दबावाला बळी पडत नसतो. आमदार किंवा नेते कमकूवत नसतात. कोणत्या तरी अधिकाऱ्यांनी दबाव टाकावा आणि दबावाखाली आमदार निवडून येतील हे हास्यास्पद आहे. तसेच अधिकारी जर दबाव आणत असेल तर त्या लोकप्रतिनिधींचे दगडाखाली हात असू शकतात यात शंका नाही असेही दरेकर यांनी स्पष्ट केले आहे.

विरोधकांना घेरण्याची आवश्यकता नाही, तसेच मूळ विषयापासून सरकार सुटणार नाही. एखादा विषय मांडला तर समोरच्या अधिकाऱ्यावर दबाव आणायचा, संबंधित अधिकाऱ्याची चौकशी लावायची अशा प्रकारे वस्तुस्थिती दडपता येणार नाही. जितेंद्र आव्हाड यांनी राजकीय वक्तव्य केलं असून येणाऱ्या काळात “दूध का दुध आणि पाणी का पाणी” होईल असे दरेकर यांनी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.