Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पश्चिम बंगाल हिंसाचार : केंद्राची चार सदस्यीय समिती आढावा घेण्यासाठी रवाना

केंद्रीय गृह मंत्रालयानं मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना बंगालमधील हिंसाचाराबाबत विस्तृत रिपोर्ट मागितला होता.

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार पहायला मिळत आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने चार सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. ही समिती सध्या पश्चिम बंगालसाठी रवाना झाली आहे.

बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसने सलग तिसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र, निकालानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत असलेला पहायला मिळतो आहे. मंगळवारपर्यंत राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या हिंसाचारांच्या घटनांमध्ये साधारणपणे सहा लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयानं पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर झालेल्या कथित हिंसेच्या कारणांची चौकशी करण्यासाठी आणि राज्यातील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी चार सदस्यीय समिती गठित केली आहे. मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली हे पथक पश्चिम बंगालला रवाना झालं असल्याचं अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितलं.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यापूर्वी केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी पश्चिम बंगाल सरकारला स्पष्टपणे सांगितलं होतं, की राज्य सरकारने अहवाल पाठविला नाही तर या प्रकरणात गांभीर्याने विचार केला जाईल. अधिकाऱ्यांच्या मते, राज्य सरकारला वेळ न गमावता अशा घटना रोखण्यासाठी पावले उचलण्यासही सांगितले गेले आहे. बंगालमधील कथित हिंसाचारात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

भाजपाने या सर्व हिंसाचारांच्या घटनांसाठी तृणमूल काँग्रेसला जबाबदार ठरवले आहे. तसेच, बंगाल सरकार छुप्या पद्धतीने या सर्वाला पाठिंबा देत असल्याचा आरोपही भाजपाने केला आहे. हिंसाचारा दरम्यान कित्येक भाजपा कार्यकर्त्यांची दुकाने लुटल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तसेच, कित्येकांच्या घरातील महिलांनाही मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आल्याचा आरोप भाजपाकडून केला जात आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.