Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ऑनलाइन पिफला देशभरातून रसिक प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद

समाज माध्यमांवर पिफ ट्रेडिंगमध्ये

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे डेस्क, दि. २० मार्च: कोरोनाच्या सावटाखाली असलेल्या आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीत चित्रपट रसिक मात्र घरबसल्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा आस्वाद घेत आहेत. गुरुवार दि १८ मार्च पासून सुरू झालेल्या ऑनलाइन पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात पिफला राज्याबरोबरच देशभरातून रसिक प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटांचे विषय, त्यांची निवड आणि ऑनलाइन व्यासपीठाच्या सुरक्षिततेची खात्री यामुळे चित्रपटप्रेमी सुखावले असून समाज माध्यमांवर देखील ऑनलाइन पिफ हे ट्रेडिंगमध्ये आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

१९ व्या ऑनलाइन पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला ‘लैला इन हायफा’ या चित्रपटाने १८ मार्च रोजी सुरुवात झाली. याविषयी अधिक माहिती देताना महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल म्हणाले, “कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीचा अंदाज आल्यानंतर चित्रपटगृहात होणारा महोत्सव तात्पुरता स्थगित करीत १८ ते २५ मार्च दरम्यान ऑनलाइन महोत्सव करण्याचा आम्ही निर्णय घेतला. अपेक्षेप्रमाणे ऑनलाइन महोत्सवाला चित्रपट रसिकांनी भरघोस प्रतिसाद दिला, याचा आम्हाला आनंद आहे. केवळ राज्यामधूनच नव्हे तर देशभरातून रसिकांनी यासाठी नोंदणी केली असून ते त्यांच्या सोयीने सुरक्षितपणे घरामध्ये बसून महोत्सवाचा आस्वाद घेत आहेत. उत्तरप्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, पंजाब, आसाम अशा अनेक राज्यांमधून प्रेक्षक महोत्सवात सहभागी झाले असून जागतिक चित्रपट विभागात निवडलेल्या चित्रपट, माहितीपट यांचे कौतुक देखील करीत आहेत.”

या वर्षीच्या ऑनलाईन महोत्सवासाठी न्यूझीलंड येथील शिफ्ट ७२ या व्यासपीठाचा वापर करण्यात आला असून यामुळे पायरसी, रेकॉर्डिंग करता येणे शक्य नसल्याने सुरक्षिततेची भावना असल्याचे अनेक प्रेक्षकांनी कळविले आहे. एकीकडे चित्रपटांचा आस्वाद घेत असताना दुसरीकडे प्रेक्षक समाज माध्यमांवर देखील महोत्सवाबद्दल भरभरून बोलत आहेत. अनेक समीक्षक आपापल्या ब्लॉग्ज वरून महोत्सवाचे कौतुक करीत आहेत तर प्रेक्षक देखील फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आदींवर फोटो शेअर करीत पिफ ट्रेंड देखील करीत आहेत. शिफ्ट ७२ सोबतच महोत्सवात निवडलेल्या गेलेल्या चित्रपटांच्या दूतावासांनी देखील आपापल्या पातळीवर महोत्सवास प्रसिद्धी दिली असून आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले आहे. प्रामुख्याने आतापर्यंत भारतात प्रदर्शित न झालेले चित्रपट घरबसल्या पाहता येत असल्याने प्रेक्षक आनंदी आहेत, असेही डॉ. पटेल यांनी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.