Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मर्चंट नेव्हीतील रोजगाराच्या संधींबाबत युवकांना अधिक माहिती व्हावी’ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 

राज्यातील मर्चंट नेव्ही सप्ताहाचे राज्यपालांच्या उपस्थितीत उदघाटन संपन्न.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई डेस्क, दि. ३१ मार्च : व्यापारी नौवहन (मर्चंट नेव्ही) क्षेत्रातील रोजगार व प्रशिक्षणाच्या संधींबाबत युवकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. त्यांना या क्षेत्राबाबत अधिक माहिती व्हावी या दृष्टीने शाळा – महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन दिले जावे अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज व्यक्त केली.

राष्ट्रीय नौवहन दिवस समितीतर्फे आयोजित राज्यभर साजरा केल्या जाणाऱ्या मर्चंट नेव्ही सप्ताहाचे  उदघाटन गुरुवारी (दि. ३१) राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भारताला व्यापारी नौवहनाचा मोठा इतिहास लाभला असून सत्य नारायण कथेपासून अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये भारताच्या सागरी व्यापाराचा उल्लेख आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सागरी वाहतुकीचे योगदान फार मोठे असून या क्षेत्राच्या माध्यमातून देशातील अर्थव्यवस्थेचे पुनरुत्थान व्हावे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

व्यापारी नौवहन क्षेत्र अधिक लोकाभिमुख व युवकाभिमुख व्हावे असे सांगताना नौवहन क्षेत्रातील कामगार व अधिकाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जावे असे राज्यपालांनी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

महात्मा गांधींनी अनेकदा जहाजाने परदेशी प्रवास केला होता. या सर्व प्रवासांच्या तारखा तसेच त्यांनी प्रवास केलेल्या जहाजांचे नाव ही दुर्मिळ माहिती प्रथमच सचित्र प्रकाशात आणल्याबद्दल राज्यपालांनी शिपिंग कॉर्पोरेशनचे अभिनंदन केले.

महिलांना शिपिंग क्षेत्रात मोठ्या संधी

महिलांनी अधिकाधिक प्रमाणात  शिपिंग क्षेत्रात यावे यादृष्टीने प्रयत्न केले जात असून मरीटाईम शिक्षण प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या महिलांना प्रतिवर्षी १ लाख रु. शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याची माहिती शिपिंग महासंचालक अमिताभ कुमार यांनी यावेळी दिली. शिपिंग क्षेत्रात व्यापार सुलभीकरणासाठी (इज ऑफ डुईंग बिझनेस) विशेष प्रयत्न केले जात असून वर्ष अखेर पर्यंत शिपिंग संबंधी सर्व सेवा ऑनलाईन देण्याबाबत प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो येथील जागतिक हवामान बदल परिषदेत केलेल्या आवाहनानुसार भारतीय नौवहन क्षेत्र नेट शून्य ग्रीनहाऊस गॅस  उत्सर्जनाचे लक्ष प्राप्त करण्याकरिता प्रयत्नरत असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय सागरी व्यापार उद्योगावर पारतंत्र्यात अनेक निर्बंध लादल्यामुळे तसेच भारतीय मालवाहू जहाजांना अनेक देशात सामानाची नेआण करण्यावर निर्बंध असल्यामुळे या क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले होते असे सांगताना दिनांक ५ एप्रिल १९१९ रोजी सिंदिया शिपिंगच्या जहाजाने मुंबई ते लंडन हा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल ५ एप्रिल हा दिवस राष्ट्रीय नौवहन दिवस म्हणून साजरा केला जातो असे अमिताभ कुमार यांनी सांगितले.

यावेळी शिपिंगचे अतिरिक्त महासंचालक कुमार संजय बरियार, मुख्य सर्व्हेयर कॅप्टन एस बारिक, नॉटिकल सल्लागार के पी जयकुमार, उपमहासंचालक डॉ पांडुरंग राऊत, राष्ट्रीय नौवहन दिवस समितीचे अध्यक्ष अतुल उबाळे, भारतीय राष्ट्रीय जहाज मालक संघटनेच्या अध्यक्षा डॉ सुजाता नाईक, नाविक संघटनेचे महासचिव अब्दुल गनी सेरंग, कॅप्टन महेंद्र पाल भसीन, कॅप्टन संकल्प शुक्ल, एस एम राय आदी यावेळी उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

एखादा निर्णय घेतल्यानंतर कारण नसताना गैरसमज निर्माण होत असतील तर तो निर्णय थांबवला जाऊ शकतो – अजित पवार

गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे नववर्षापासून नवीन संकल्प करुयात – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

 

 

Comments are closed.