Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गणेशोत्सव आणि दहीहंडी निर्बंधमुक्त, शिंदे सरकारचा मोठा निर्णय

यावर्षी निर्बंधमुक्त गणेश उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 21 जुलै :-  दहीहंडी आणि गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोरोनामुळे गेले 2 वर्ष महाराष्ट्रातील हे मोठे सण हे साधेपणाने साजरे करण्यात आले. मात्र या सणांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यावेळेस दहीहंडी आणि गणेशोत्सव  कोणत्याही कोरोनो निर्बंधाशिवाय साजरा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वृत्त पत्रकार परिषद घेत दिलं. विशेष म्हणजे गणेश मूर्तीच्या उंचीवरील मर्यादा काढून टाकण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दहीहंडी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे नियम पाळले गेले पाहिजे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा  करण्यासाठी एसटी प्रशासनाला जादा गाड्या सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहे.  परिवहन विभागास वाहतूक नियोजनाचे आदेश देण्यात आले आहे.  प्रमुख महामार्गांवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून महामार्ग पोलिसांनाही सूचना देण्यात आले आहे.  यंदा गणेशोत्सव 31 ऑगस्ट 2022 ते रविवार 9 सप्टेंबर 2022 या कालावधीत साजरा होणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गणोशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव आहे. या सणानिमित्त लोक आपापल्या घरी जातात. अशा चाकरमानींच्या सोयीसाठी कोकणात  जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोल माफ करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.   त्यामुळे या सणासुदीच्या काळात प्रवाशांना दिलासा मिळणार आहे तसेच  प्रवाशांच्या सोयीसाठी गणपती उत्सवानिमित्त एकूण 214 विशेष  रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत. जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत या गाड्या चालवण्यात येणार आहेत.

Comments are closed.