Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्य शिक्षण मंडळाचे परीक्षेसंदर्भात मोठे निर्णय; दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सदर परीक्षांचा कालावधी व स्वरूप निश्चित करण्यासाठी शासन व मंडळामार्फत मुख्याध्यापक, विषय शिक्षक व तत्सम तज्ञांशी विचारविनिमय करून सदर परीक्षांचा कालावधी व स्वरुप निश्चित करण्यात आले आहे. तसेच परीक्षा सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरणात पार पाडण्याकरिता विद्यार्थ्यांसाठी काही विशेष उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

परीक्षेचा कालावधी :

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्रचलित पद्धतीनुसार इ. १२ वीची परीक्षा २० फेब्रुवारी दरम्यान व इ. १० वीची परीक्षा ०१ मार्च दरम्यान सुरु करण्यात येते. तथापि चालू वर्षी नेहमीपेक्षा सुमारे दोन आठवडे उशिराने म्हणजेच पुढील कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत.

इ.१२ वी – लेखी परीक्षा – दि.०४ मार्च २०२२ ते दि. ३० मार्च २०२२,  श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन – दि. १४ फेब्रुवारी २०२२ ते दि.०३ मार्च २०२२ इ.१० वी – लेखी परीक्षा – दि. १५ मार्च २०२२ ते दि.०४ एप्रिल २०२२, श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन – दि. २५ फेब्रुवारी २०२२ ते दि. १४ मार्च २०२२

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

विद्यार्थी संख्या- सद्यस्थितीत मंडळाकडे परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी :

इ.१२ वी – १४,७२,५६२    इ.१० वी-१६,२५,३११

विषय, माध्यम व प्रश्नपत्रिका संख्या :

मंडळाची परीक्षा सार्वत्रिक स्वरुपाची असून संपूर्ण राज्यात एकाच वेळी एकसमान प्रश्नपत्रिकेवर आयोजित केली जाते. यामध्ये वस्तुनिष्ठ, लघुत्तरी व दिर्घोत्तरी प्रश्नांचा समावेश असतो.

इ.१२ वी- विषय १५८, विज्ञान शाखा माध्यम-०४, इतर शाखा माध्यम-०६, प्रश्नपत्रिका संख्या-३५६

इ.१० वी – विषय ६०, माध्यम – ०८, प्रश्नपत्रिका संख्या-१५८

परीक्षेत विविध घटकांचा सहभाग :

सदर परीक्षांसाठी प्रामुख्याने मुख्याध्यापक, प्राचार्य, केंद्रसंचालक, पर्यवेक्षक, परिरक्षक, मुख्य नियामक, नियामक, परीक्षक, लिपिक व चतुर्थश्रेणी कर्मचारी तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी व मंडळाचे सर्व अधिकारी व कर्मचारी अशा सुमारे १.७५ लक्ष घटकांचा समावेश असतो.

कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेता प्रचलित ऑफलाईन पद्धतीने आयोजित परीक्षांसाठी पुढील उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.

परीक्षा केंद्रे :

प्रचलित पद्धतीनुसार मंडळाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षा घेतल्या जातात. तथापि सदर परीक्षेसाठी शाळा तेथे परीक्षा केंद्र/उपकेंद्र देण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थी ज्या शाळा / कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहेत तेथेच त्यांना लेखी परीक्षा देता येईल. त्यामुळे त्यांना परिचित वातावरण मिळून परीक्षा देण्यास सुलभता वाटेल. तसेच परीक्षेसाठी कमी प्रवास करावा लागेल.

परीक्षेची वेळ :

विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी असल्यामुळे लेखी परीक्षेच्या ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी ३० मिनिटे जादा वेळ तसेच ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटांचा जादा वेळ देण्यात आला आहे.

अभ्यासक्रम :

कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यापूर्वीच अभ्यासक्रमात २५% कपात करण्यात आली आहे. त्यामुळे लेखी परीक्षेचे आयोजन ७५% अभ्यासक्रमावर करण्यात आले आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रचलित पद्धतीनुसार विशेष सवलती देण्यात येतील.

प्रात्यक्षिक परीक्षा :

कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे बहुसंख्य शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना निर्धारित प्रात्यक्षिक कार्ये पूर्ण करता आली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना याबाबत सवलत देण्यात आलेली आहे. इ.१२ वी- प्रात्यक्षिक कार्य हा भविष्यातील अभ्यासक्रमासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. सदर परिस्थिती लक्षात घेता उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत प्रात्यक्षिकासाठी विषयनिहाय अभ्यासक्रमाच्या किमान ४०% प्रात्यक्षिकांवर आधारित परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. इ.१० वी – शाळांमार्फत प्रात्यक्षिकासाठी विषयनिहाय अभ्यासक्रमाच्या किमान ४०% प्रात्यक्षिकांवर आधारित परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष प्रात्यक्षिक परीक्षेचे आयोजन शक्य न झाल्यास प्रात्यक्षिकाऐवजी लेखन कार्यावर आधारित प्रात्यक्षिक परीक्षेचे आयोजन केले जाईल.

किमान ४० % च्या मर्यादेत शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना परीक्षेसाठी प्रयोग निवडण्याची लवचिकता असेल. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी अंतर्गत व बहि:स्थ परिक्षक संबधित शाळा / उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामधून नियुक्त करण्यात येणार आहेत. गर्दी टाळण्यासाठी पुरेशा उपाययोजना केल्या आहेत. परीक्षांचे नियोजन व सबमिशन गटनिहाय केले जाईल.

तोंडी परीक्षा :

तोंडी परीक्षा अंतर्गत व तत्सम मूल्यमापन-याबाबत मूळ आराखडा विचारात घेऊन सुलभता ठेवण्याची शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना मुभा दिली आहे.

विशेष सवलत :

कोणताही विद्यार्थी आजारी पडल्यास किंवा अपरिहार्य कारणामुळे श्रेणी, तोंडी परीक्षा, अंतर्गत व तत्सम मूल्यमापन, प्रात्यक्षिक/ सबमिशन करू न शकल्यास लेखी परीक्षेनंतर इ.१०वी आणि इ.१२वी च्या विद्यार्थ्यांना यासाठी पुन्हा संधी देण्यात येईल. यासाठी वेगळे शुल्क घेतले जाणार नाही.

सुरक्षात्मक उपाययोजना :

सर्व परीक्षा केंद्रांवर कोविड-१९ मुळे आजारी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र परीक्षा कक्ष असेल. जर एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेदरम्यान लक्षणे दिसली तर विद्यार्थ्याला स्वतंत्र कक्षात परीक्षा देण्याची मुभा असेल. जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रामार्फत परीक्षा केंद्राला आवश्यक ती वैद्यकीय मदत पुरवली जाईल.

विद्यार्थ्यांना १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका :

कोविड-१९ च्या संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर किमान एक ते दिड तास अगोदर उपस्थित राहणेबाबत कळविण्यात येईल. विद्यार्थ्याला १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका दिली जाईल. यामुळे ती सोडविण्याबाबत त्याला नियोजन करता येईल.

विद्यार्थ्यांच्या आरोग्यास प्राधान्य :

सर्व परीक्षांसाठी विद्यार्थी व संबंधित घटकांकरिता कोविड-१९ संदर्भात शासन व आरोग्य विभागाच्या सर्वं सूचनांचे पालन करणे अनिवार्य असेल. याबाबतच्या तपशीलवार मार्गदर्शक सूचना मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतील.

विभागीय मंडळनिहाय helpline : मंडळाच्या परीक्षेशी संबंधित सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी मंडळामार्फत विभागीय मंडळनिहाय helpline सुरु करण्यात येईल.

उच्च स्तरीय नियंत्रण समिती : तसेच परीक्षा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी एक उच्च स्तरीय नियंत्रण समिती स्थापन करण्यात येईल.

हे देखील वाचा : 

वाघाच्या हल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

पोस्ट मॅट्रीक स्कॉलरशिप योजना शिष्यवृत्तीसाठी डीबीटीवर 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

अल्पवयीन मुलीच गर्भपात प्रकरण : डॉ. कदम यांच्या कारनाम्यानंतर मंत्रालय अलर्ट

Comments are closed.