Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दारूमुक्त व व्यसनमुक्त होण्यासाठी ५५ रुग्णांनी केला निर्धार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १६ जानेवारी: मुक्तिपथ अभियानाच्या वतीने व्यसनी रुग्णांवर उपचार करण्यासाठी कुरखेडा, अहेरी, चामोर्शी व सिरोंचा तालुक्यात दर शुक्रवारी तालुका क्लिनिकचे आयोजन केल्या जाते. १५ जानेवारी रोजी चारही तालुका कार्यालयात आयोजित क्लिनिकला एकूण ५५ रुग्णांनी भेट देऊन उपचार घेतला. दारूमुक्त होण्याची इच्छा असणाऱ्यांनी तालुका क्लिनिकला किंवा गाव पातळीवरील शिबिराला भेट देऊन उपचार घेण्याचे आवाहन मुक्तिपथने केले आहे.

आलापल्ली शहरातील होंडा शोरूम जवळील मुक्तिपथ तालुका कार्यालयात २१ रुग्णांनी क्लिनिकला भेट देऊन उपचार घेतला. सिरोंचातील रामाराव दुधीवार यांच्या घरी असलेल्या तालुका कार्यालयात ६ रुग्णांवर, चामोर्शी येथील पोष्ट ऑफिस जवळील कार्यालयात १५ रुग्णांवर तर कुरखेडातील नवीन बस स्टॅन्ड जवळ सुरेश मॉलच्या बाजूला असलेल्या तालुका कार्यालयात १३ रुग्णांवर उपचार करण्यात आले. या चार तालुक्यात क्लिनिकच्या माध्यमातून एकूण ५५ रुग्णांनी उपचार घेत दारू सोडण्याचा निर्धार केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

क्लिनिकच्या भेट देणाऱ्या रुग्णांना समुपदेशन केले जाते. दारूचे व्यसन हा एक मानसिक आजार आहे आणि तो उपचाराने बरा होतो. दारूची सवय सोडण्यासाठी तसेच यातून उद्भवणारा त्रास कमी करण्यासाठी उपचार घेणे आवश्यक आहे. दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, धोक्याचे घटक, नियमित औषोधोपचार घेणे आदींची माहिती रुग्णांना सांगण्यात येते. मुक्तीपथ तालुका कार्यालयांमध्ये ठराविक दिवशी क्लिनिकचे आयोजन केल्या जाते. दारूचे व्यसन सोडण्याची इच्छा असणा-या जास्तीत जास्त रुग्णांनी क्लिनिकला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले.

Comments are closed.