Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उभारणार भव्य वसतीगृह – आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी

नऊ मजली इमारतीमध्ये 650 विद्यार्थ्यांची होणार सोय; 44 कोटींची प्रशासकीय मान्यता प्रदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. 16 फेब्रुवारी: राज्यभरातून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या आदिवासी जमातीतील विद्यार्थ्यांना राहण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. यासंबंधी गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांकडून वसतीगृहाची मागणी केली जात होती. या मागणीची दखल घेत आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी पुण्यातील हडपसर भागात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह उभारण्याचा निर्णय घेतला असून राज्य शासनाने या वसतीगृह इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शैक्षणिक सोयीसुविधा असल्यामुळे राज्यभरातील विविध विद्यार्थी पुण्यात प्रवेश घेत असतात. त्याचप्रमाणे राज्यातील आदिवासी जमातीतील अनेक विद्यार्थी हे पुण्यातील विविध शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश घेतात. मात्र, प्रवेशानंतर अशा विद्यार्थ्यांना राहण्याची सोय होत नसल्यामुळे त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. अशा विद्यार्थ्यांकडून वसतीगृह उभारण्याची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती. त्यांच्या मागणीची पूर्तता करण्याच्या दृष्टिने आदिवासी विकास विभागाने पावले उचलली. पुण्यातील राहण्याची गैरसोय दूर करण्यासाठी हडपसर भागातील मौजे महंमदवाडी येथे आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी 44 कोटी 85 लाख रुपयांचे अंदाजपत्रक व आराखडा सादर करण्यात आला होता. या अंदाजपत्रकास आदिवासी विभागाने आज प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.

आदिवासी विकास मंत्री श्री. पाडवी म्हणाले की, आदिवासी मुलांच्या वसतीगृहाची इमारत नऊ मजली असणार आहे. यामध्ये इयत्ता आठवी ते पदव्युत्तर पदवीपर्यंतच्या सुमारे साडेसहाशे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या वसतीगृहाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पुण्यात येणाऱ्या आदिवासी मुलांसाठी ही एक चांगली सोय होणार असून यामुळे त्यांच्या राहण्याचा प्रश्न सुटणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष देता येईल.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.