Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुंबईत एक कोटीची पुस्तके जळून खाक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई, दि. १० डिसेंबर : मुंबईतील किताबखाना  या पुस्तकांच्या दुकानाला बुधवारी भीषण आग लागली. या आगीत सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दुकानातील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. 

मुंबईतील फोर्ट परिसरात सोमय्या बिल्डिंगच्या तळमजल्यावर किताबखाना हे दुकान आहे. दीडशे वर्षांपूर्वी हे दुकान सुरू करण्यात आले होते. जगातील कोणतेही पुस्तक तेथे उपलब्ध होत होते. बुधवारी लागलेल्या या आगीत पुस्तकांचा मोठा संग्रह जळून खाक झाला आहे. आगीची माहिती मिळताच मुंबई मनपा अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या सोबत आठ फायर इंजिन, सहा जंबो टँकर्स व अंबुलन्स रवाना करण्यात आली. जवानांनी इमारतीमधून कर्मचाऱ्यांसह ३० जणांना सुखरूपपणे बाहेर काढले. त्यानंतर आग आटोक्यात आणली गेली असून दुकानाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अग्निशमन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार किमान एक कोटींचे साहित्य आगीत खाक झाले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या दुर्घटनेबाबत किताबखाना व्यवस्थापनाने ट्वीटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. ‘किताबखाना दुकानात आग लागली असून आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. पुस्तकांचे किती प्रमाणात नुकसान झाले आहे, हे आत्ताच सांगता येणार नाही. मात्र, आमचा सर्व स्टाफ सुरक्षित आणि सुखरूप आहे, ही आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब आहे. आगीच्या घटनेमुळे तूर्त आम्हाला दुकान बंद ठेवावे लागणार असून ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीमुळे आम्ही दिलगीर आहोत’, असे करण्यात आले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.