Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणार्थीनी समाजासाठी प्रेरक म्हणून कार्य करावे -डॉ. विवेक जोशी यांचे प्रतिपादन

परीक्षा केंद्रातील दोन प्रशिक्षणार्थीची शासन सेवेत नियुक्ती

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 12 एप्रिल – गडचिरोलीसारख्या क्षेत्रामधून स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाची प्रेरणा व स्पर्धा परीक्षेतील संधीचे महत्त्व सर्व गावांमध्ये पोहोचविणे गरजेचे आहे. प्रशिक्षणार्थी हा समाजव्यवस्थेचा भाग असल्याने त्यांना मिळालेले यश, मिळणाऱ्या सेवा व सुविधा ह्या समाजाच्या योगदानातून मिळत असल्याने यांची जाणीव ठेवून समाजासाठी प्रेरक म्हणून कार्य करावे, असे प्रतिपादन पीजीटीडी इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. विवेक जोशी यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेअंतर्गत स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2023-24 च्या सत्रातील प्रशिक्षणार्थींचा निरोप समारंभ व गुणवंत सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. जोशी बोलत होते. यावेळी, ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संचालक (प्र.) डॉ. रजनी वाढई, टी.आर.टी.आय. प्रशिक्षण कार्यक्रम समन्वयक डॉ. वैभव मसराम, सह-समन्वयक प्रा. सत्यनारायण सुदेवाड, कार्यक्रम समन्वयक प्रवीण गिरडकर तसेच प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आयुष्यात यशस्वी होण्यामागे अनेक लोकांचे योगदान असते. ही भावना प्रशिक्षणार्थ्यांनी कायम ठेवून समाजाच्या सेवेसाठी तत्पर राहणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षा हे आयुष्यातील ध्येय ठरविल्यानंतर मानसिकता खचू न देता, परिस्थितीवर मात करून प्रवास यशस्वी करणे व सेवा देणारे अधिकारी म्हणून कार्य करतांना स्वतःवरील विश्वास व स्वतःचे मत मांडून संघर्षाचा वारसा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे असल्याचे मत प्रमुख वक्ते म्हणून गोंडवाना विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संचालक (प्र.) डॉ. रजनी वाढई यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने स्पर्धा परीक्षा केंद्र चालविण्यात येत आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या अनुदानातून पात्रता परीक्षेच्या माध्यमातून 25 प्रशिक्षणार्थीं विद्यार्थ्यांची नागरी सेवा प्रशिक्षण कार्यक्रमाकरीता निवड करण्यात आली होती. सदर प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत 11 महिने कालावधीत स्पर्धा परीक्षेचे अभ्यासक्रम व मुलाखत यांचे संपूर्ण प्रशिक्षण देण्यात येत असून स्पर्धा परीक्षांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा सहभाग व निकाल वाढविण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. या प्रशिक्षण केंद्रातील गोविंदा मंगलदास पुंगाटी याची शासनाच्या आरोग्य विभागामध्ये आरोग्य पर्यवेक्षक पदावर निवड झाली. तर नितेश मुखरू दडमल याची सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक येथे शिपाई पदावर निवड झाली आहे.

तसेच सुरज मडावी, उषा आलामी, कामाक्षी करपेत, शुभम सयाम व मंगला मडावी, शासकीय भरतीच्या प्रतीक्षा यादीमध्ये असून 07 प्रशिक्षणार्थी विद्यार्थी एम.पी.एस.सी. ग्रुप-सी मुख्य परीक्षेकरीता पात्र झाले आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय आई-वडील तसेच गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, वित्त व लेखा अधिकारी  भास्कर पठारे व आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांना दिले आहे.
स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम समन्वयक डॉ. वैभव मसराम व सह-समन्वयक प्रा. सत्यनारायण सुदेवाड, कार्यक्रम समन्वयक प्रवीण गिरडकर, सहाय्यक प्रमोद उईके, संजय पोरेटी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी करीता मोलाची भुमिका पार पाडली. कार्यक्रमाचे संचालन प्रशिक्षणार्थी कुणाल चौधरी व आभार प्रदर्शन अमित मलगाम यांनी मानले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

 

Comments are closed.