Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शेतकर्‍यांनो महावितरणची वीजबिले भरू नका: शेतकरी कामगार पक्षाचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, १८ फेब्रुवारी: राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सरकारने वीजबिल वसूलीची सुरू केलेली मोहीम पुर्णतः चुकीची आणि बेकायदेशीर असून राज्यातील शेतकऱ्यांनी महावितरणने पाठविलेल्या अव्वाच्या सव्वा वीजबिलांची रक्कम भरु नये, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई रामदास जराते यांनी केले आहे.

शेतकरी कामगार पक्षातर्फे दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, सन २००८ पासून राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या वीजबिलापोटी २/३ रक्कम अनुदान स्वरूपात द्यायचे मान्य केले होते आणि त्यानुसार शासनाने ती अनुदानाची रक्कम महावितरणकडे जमा सुद्धा केली. सदर अनुदान रक्कम ही २/३ म्हणजे चोवीस तास वीज वापर गृहीत धरून त्यापैकी सोळा तासांचा हिशेब लावून दिली गेली आहे. याशिवाय शेतकर्‍यांनी उर्वरित १/३ म्हणजे आठ तासांच्या वीज वापराचे बिल भरले आहे किंवा काहींचे थकित आहे. परंतु प्रत्यक्षात ग्रामीण भागात शेतीसाठी फक्त आठच तास वीजपुरवठा झाला असून त्याचा प्रत्यक्ष वापर हा मिटर रिडींगनुसार उघड आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आता शासनाकडून सोळा तासांच्या वीजवापराचे अनुदान आणि शेतकर्‍यांकडून आठ तासांची पुर्ण किंवा अंशतः रक्कम असे एकुण जमा रकमेची वस्तुस्थिती, तर प्रत्यक्षात आठच तासांचा वीजवापर हे वास्तव चित्र समोर आले असून सरकारकडून आणि शेतकर्‍यांकडून जमा रकमेपेक्षा कमी वीजपुरवठा असताना आणि त्यामुळे उलट शेतकर्‍यांची जास्त रक्कम महावितरणकडे जमा असतानासुद्धा आत्ताची वीजबिल वसूली ही अत्यंत चुकीची, बेकायदेशीर आणि अन्यायी आहे, असेही भाई रामदास जराते यांनी म्हटले आहे.

आयआयटी पवई या तिऱ्हाईत संस्थेचा आणि महाराष्ट्र वीज नियामक मंडळाच्या समितीने दिलेल्या अहवालानुसार महावितरणकडून शेतकर्‍यांनी न वापरलेल्या वीजेची वसूली शासकीय अनुदान अधिक शेतकऱ्यांकडून अशी एकत्रितपणे वसूल रक्कम ही जवळपास तीस हजार कोटी रुपये इतकी प्रचंड आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी महावितरचे काहीही देणे लागत नाही, तर उलट महावितरणकडेच शेतकर्‍यांच्या वीजबिलापोटी आगाऊ रक्कम जमा आहे, अशी माहितीही भाई रामदास जराते यांनी दिली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यामुळे राज्यातील शेतकर्‍यांनी सदरचे वीजबिले न भरता औरंजेबाला वाजविणाऱ्या या आधुनिक जिझीया कररूपी वीजबिल वसूलीला तीव्र विरोध करावा असे आवाहनही शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई रामदास जराते, मध्यवर्ती समीती सदस्य भाई चंद्रशेखर नलावडे-पाटील, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, संजय दुधबळे,रोहिदास कुमरे, अशोक किरंगे,युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, तुकाराम गेडाम, दामोधर रोहनकर, रमेश चौखुंडे, प्रदिप आभारे, चंद्रकांत भोयर, विजया मेश्राम यांनी केले आहे.

Comments are closed.