Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यपाल विरुद्ध सरकार वाद पेटला; कोश्यारी यांना परत बोलवा, शिवसेनेची केंद्राकडे मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, 13 फेब्रुवारी: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी  हे राज्यातील भाजपाच्या  मर्जीनुसार कारभार हाकतात, असा आरोप शिवसेनेने शनिवारी केला आहे. त्यानंतर शिवसेनेनं म्हटलं आहे की, केंद्र सरकारला जर वाटत असेल की, राज्यातील सरकार संविधानिक कायद्यांनुसार चालावं, तर भगतसिंग कोश्यारी यांना परत बोलावून घ्यावं. सध्या राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थिर व मजबूत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करण्यासाठी केंद्र सरकार राज्यपालांच्या खांद्याचा वापर करू शकत नाही.

शिवसेनेने आपल्या सामना मुखपत्राच्या संपादकीयातूनही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर भाष्य केलं आहे. भगतसिंह कोश्यारी गेली अनेक वर्षे राजकारणात आहेत. ते केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री देखील होते. तथापि, ते महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यापासून नेहमीच कोणत्या तरी कारणांवरून वादाच्या भोवऱ्यात राहिले आहेत. ते नेहमी वादात का असतात? असा प्रश्न शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अलीकडेच सरकारी विमानाच्या प्रवासावरून भगतसिंग कोश्यारी चर्चेत आले होते. राज्यपालांना सरकारी विमानाने देहरादूनला जायचं होतं, परंतु राज्य सरकारने सरकारी विमानासाठी परवानगी दिली नाही. त्यानंतर ते खाजगी विमानाने देहरादूनला गेले. यावरुन राज्यातील राज्यपाल आणि सरकार हा वाद पुन्हा नव्याने उकरून निघाला.

विरोधी पक्ष भाजप आता हा मुद्दा पेटवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही शिवसेनेने म्हटलं आहे. राज्य सरकारने विमान उड्डाणासाठी परवानगीच दिली नव्हती, तर ते विमानात बसलेच कसे? असा प्रश्नही शिवसेनेनं आपल्या अग्रलेखात विचारला आहे. अग्रलेखात म्हटलं आहे की, राज्यपालांचा हा वैयक्तिक दौरा होता आणि कायद्यानुसार राज्यपालच नव्हे, तर मुख्यमंत्री देखील वैयक्तिक कारणांसाठी सरकारी विमानांचा वापर करू शकत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाने कायद्याच्या चौकटीत राहून काम केलं आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

याप्रकरणावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर अहंकारी असल्याचा आरोप केला. आता शिवसेनेने पलटवार करताना म्हटलं की, अहंकाराचं राजकारण कोण करीत आहे? हे पूर्ण देशाला ठाऊक आहे. दिल्लीच्या सीमेवरील तीन कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनादरम्यान 200 हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असूनही केंद्र सरकार हे कायदा मागे घेण्यास तयार नाही. हा अहंकार नाही का? असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.

Comments are closed.