Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी तालुक्यात निवडणूक प्रक्रियेतील सर्वांचीच होणार कोरोना चाचणी – तहसीलदार ओंकार ओतारी यांची माहिती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. ०४ जानेवारी: अहेरी तालुका हा राजकीयदृष्ट्या महत्वाचा समजला जातो. राजनगरी अशी अहेरीची ख्याती आहे. जिल्ह्याचे राजकारण राजनगरी अहेरीच्या समावेशाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. कोरोनाचा सावटात ग्रामपंचायत निवडणुकीची रनधुमाळी ऐन रंगात पोहोचली आहे. नक्षलदृष्ट्या संवेदन शील असलेल्या या तालुक्यात निवडणूक प्रक्रिया राबविणे पोलीस आणि प्रशासनासमोर एक मोठे आव्हानाचे असते. ही निवडणुक घेण्यासाठी प्रशासन सज्ज झाली आहे.

कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जाईल. त्यानंतर त्यांना मतदान केंद्रावर पाठवले जाईल. निवडणूकीत उभे असलेले उमेदवार व त्यांच्या सहकार्‍यांची कोरोना चाचणी केली जाईल. प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाईल. ऑक्सिमीटर, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर उपलब्ध करून दिले जाईल. अशी माहिती अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दिली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अहेरी तालुक्यातील एकूण २९ ग्रामपंचायतीमध्ये २७३ ग्रामपंचायत सदस्य निवडून द्यायचे आहे. एकूण ९९ प्रभाग असून ८३८ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. एकूण ५४ हजार ३६७ मतदार आहेत. त्यापैकी महिला मतदारांची संख्या २७ हजार १५९ व पुरुष मतदारांची संख्या २७ हजार २०६ एवढी आहे.

अहेरी तालुक्याचा बहुतांश भाग नक्षलदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. तालुक्यात २९ ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. यासाठी एकूण १०४ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी सुमारे ४६ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील, २० मतदान केंद्रे संवेदनशील तर ४१ मतदान केंद्रे साधारण आहेत. त्यामुळे तालुक्यात मतदानाची प्रक्रिया पार पाडणे पोलीस विभागासमोर आव्हान आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

निवडून द्यायचं एकूण २७३ सदस्यांपैकी अनुसूचित जमातींचे १७६, अनुसूचित जातींचे ४०, मागास प्रवर्गातील १६ व सर्वसाधारण ३५ असे आरक्षण जाहीर झाले आहे. संवेदनशील मतदान केंद्रे लक्षात घेता मोठ्या प्रमाणात पोलिस ताफ्याची गरज भासणार आहे. त्यासाठी पोलिस विभागाने तयारी केली आहे. तसेच निवडणूक विभागासाठी पाचशे मनुष्यबळाची गरज आहे. आलापल्ली व नागेपल्ली येथे ८०० पेक्षा जास्त मतदार असल्यामुळे या ठिकाणी पाच सहाय्यक मतदान केंद्रे देण्यात आली आहेत. १६ मतदान पथक राखीव ठेवली जाणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी व झोनल अधिकारी म्हणून प्रत्येकी ९ लोकांची निवड करण्यात आली आहे.

Comments are closed.