Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात दुसऱ्याही टप्यातील २३१ गावांची निवडणूक झाली दारूमुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २२ जानेवारी: जिल्ह्यातील चामोर्शी,  मुलचेरा,  अहेरी,  एटापल्ली,  सिरोंचा,  भामरागड या सहा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवारी पार पडली. यात दारूमुक्त निवडणूक करण्यासाठी प्रयत्न केलेल्या २३१ गावांना यश मिळाले आहे.

सहाही तालुक्यातील निवडणूक दारूमुक्त झाली आहे. मुक्तिपथ संचालक व तालुका चमूंनी दिलेल्या भेटीनुसार बहुतांश गावात दारूचे वाटप न झाल्याने शांततेत निवडणूक झाली. दारूमुक्त निवडणूक अभियान यशस्वी करण्यासाठी १६०४ उमेदवारांनी सुद्धा विशेष सहकार्य केले आहे. महाराष्ट्रात असा अभिनव उपक्रम राबविणारा गडचिरोली जिल्हा एकमेव ठरला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पहिल्या टप्यात पार पडलेल्या निवडणुकीदरम्यान ‘दारूमुक्त निवडणुक’ अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. देसाईगंज २५, आरमोरी २८, कुरखेडा ३०, कोरची ४५,धानोरा ४६, गडचिरोली ६२ अशा एकूण २३६ गावांनी ठराव घेऊन दारूमुक्त निवडणुकीसाठी यशस्वी प्रयत्न केले होते. त्याच प्रमाणे दुसऱ्या टप्यातील निवडणुकीसाठी  चामोर्शी ४१, मुलचेरा ४३, एटापल्ली ४७, अहेरी ३७, सिरोंचा ६३ अशा एकूण २३१ गावांनी सुद्धा यशस्वी प्रयत्न केले आहे. जिल्ह्यातील एकूण ४६७ गावांनी दारूमुक्त निवडणुकीसाठी ठराव घेतला . त्याचप्रमाणे सहा तालुक्यातील १६०४ उमेदवारांनी देखील दारूचे वाटप न करण्याचा संकल्प केला होता. यात चामोर्शीतील ४२५ उमेदवार , मुलचेरा २३४, एटापल्ली २३३, अहेरी १५८ व  सिरोंचातील ५५४ उमेदवारांनी संकल्प पत्रावर स्वाक्षरी केली होती. मतदार व उमेदवारांच्या पुढाकारातून दुसऱ्या टप्यातील निवडणूक सुद्धा दारूमुक्त झाली. मतदानाच्या दिवशी मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता व तालुका चमूंनी  गावांना भेटी दिल्या असता शांततेत निवडणूक प्रक्रिया होताना दिसली. कुठेही खुलेआम दारूचे वाटप होताना दिसले नाही, मात्र काही गावांतिल लोक दारू पिऊन होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

चामोर्शी तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतमध्ये निवडणूक झाली. बहुतांश गावात दारूचे वाटप न झाल्याने शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडली तर काही गावांमध्ये मतदार दारूच्या नशेत आढळून आले. मुलचेरा तालुक्यातील गावांना भेटी दिले असता मतदार शुद्धीत राहून मतदान करताना दिसून आले. या गावांमध्ये कुठेही दारूचे वाटप झाले नसून शांततेत निवडणूक झाली. अहेरीतील २९ ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बहुतांश गावांमध्ये दारूमुक्त निवडणूक झाली. पूर्वी मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात दारूचे वाटप होत असे दारूच्या नशेत बुडलेले मतदार अयोग्य उमेदवारांची निवड करीत होते. मात्र यंदाची निवडणूक दारूमुक्त झाली असल्याचे मत काही गावांतील नागरिकांनी व्यक्त केले. सिरोंचामध्ये तालुका चमूच्या भेटीदरम्यान एकाही गावात दारूचे वाटप होताना दिसून आले नाही. निवडणूक प्रक्रिया पूर्णतः शांततेत पार पडली. एटापल्लीतील काही गावांना भेटी दिल्या असता दारूचे वाटप होताना दिसले नाही . या तालुक्यात देखील शांततेत निवडणूक झाली. एकंदरीत पहिल्या व दुसऱ्या टप्यातील ग्रामपंचायत निवडणूक दारूमुक्त झाली. यासाठी जिल्हाभरातील ४७४ गावांसह ३२७९ उमेदवारांनी विशेष सहकार्य केले आहे. ‘दारूमुक्त निवडणूक’ अभियान राबविणारा गडचिरोली एकमेव जिल्हा ठरला आहे.

Comments are closed.