Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

Exclusive Story: तीन कोटींची वार्षिक उलाढाल करणाऱ्या मंगल दळवी ठरल्या महिलांसाठी प्रेरणादायी

स्पेशल प्रतिनिधी – सचिन कांबळे , लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जागतिक महिला दिनानिमित्य लोकस्पर्श न्यूज ची एक्सक्लूसिव्ह यशोगाथा..

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पुण्याच्या मावळमधील मंगल दळवी यांचे शिक्षण अवघं चौथी, वय ५२ वर्षे आणि वार्षिक उलाढाल तीन कोटींची.

अवघं चौथी पर्यंतच शिक्षण घेतलेली ५२ वर्षाची महिला आज किती रुपयांची वार्षिक उलाढाल करत असेल? असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुमचं उत्तर कोटींच्या घरात नक्कीच नसेल. पण मावळात एक महिला याला अपवाद आहे. त्यामुळे आता तुम्हाला पुढचे प्रश्न नक्कीच पडले असतील की, ही महिला नेमकी कोण?  काय व्यवसाय करते? किती कोटींची उलाढाल करते? महिला दिनाच्या निमित्ताने तुम्हाला या सर्वांची उत्तरं मिळणार आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अवघं चौथीचं शिक्षण घेतलेल्या या आहेत पुण्याच्या मावळमधील मंगल दळवी. केवळ इंग्रजीत रोपांची नावं घेण्याईतकच त्यांचं कर्तृत्व आहे असं नव्हे तर आज बावन्नव्या वर्षात त्या वार्षिक तीन कोटींची उलाढाल करत आहेत. होय, तुम्हाला विश्वास बसत नसला तरी त्यांच्या योगदानामुळे दळवी कुटुंबियांच्या संसाराची घडी बसलेली आहे. हलाखीच्या परिस्थितीने त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं पण रोपवटीकेच्या छंदाने मात्र त्यांना अच्छे दिन दाखवले.

मंगल दळवी म्हणाल्या, हलाखीच्या परिस्थितीमुळे मी केवळ चौथीपर्यंत शिक्षण घेऊ शकले. तेंव्हाच माझा भाऊ रोपवाटीकेचे प्रशिक्षण घेत होता. नंतर त्याने रोपवाटीकेचे व्यवसाय सुरू केले. मला ही त्याची आवड निर्माण झाली. मी ही भावाला मदत करता करता शिकून घेतलं. लग्नानंतर इथल्या शेतीचा अंदाज घेतला. पण पारंपरिक शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हतं, भविष्याचा विचार केला तर प्रगती होणार नव्हती. मग मी पतींना रोपवाटीकेच्या व्यवसायबाबत कल्पना दिली. त्यांचा होकार मिळताच पाच गुंठ्यांत गुलाब फुलांची रोपं फुलवली. बघताबघता व्यवसाय बहरला आणि आज तीन कोटींची उलाढाल होऊ लागली. इतका मोठं भांडवल होईल आणि देशभरातून रोपांना मागणी येईल अशी अपेक्षा कधी केली नव्हती.

वर्षाला कसेबसे तीस हजार व्हायचे, आता तीन कोटींची उलाढाल होते. पत्नी मंगल दळवी मुळं हे दिवस पाहण्याचं भाग्य लाभलं. याचं सर्व श्रेय आम्ही तिलाच देतो. असे मत मंगल दळवी यांचे पती मारूती दळवी यांनी व्यक्त केले.

एकीकडे पतींना उभारी मिळाली तर दुसरीकडे मुलाने आईच्या घामातून प्रेरणा घेतली आणि स्वतः बीएससी ऍग्रीची पदवी घेत, तो रोपवाटीकेला हातभार लावतोय. मंगल दळवींच्या रोपवाटिकेत आज चाळीस जणांना रोजगार मिळालाय, शिवाय परिसरातील गरजूंना त्या प्रशिक्षण ही देतात. म्हणूनच याची दखल प्रशासनाने ही घेतली आहे.

जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ मोठमोठ्या पदव्या हाती असायलाच हव्यात, या धारणेला मंगल दळवींनी तिलांजली दिली आहे.

Comments are closed.