Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चला बागेमध्ये पाना फुलांचे कार्टून्स बघायला ! पेपा पिग, ट्वीटी, ब्लूई, माशा अँड द बियर, सिल्व्हेस्टर अनुभवायला !

दोन वर्षाच्या खंडानंतर येत्या ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान अधिक उत्साहाने भरणार उद्यान विद्या प्रदर्शन !

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई  21 जानेवारी :- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात येत्या लवकरच अनोख्या पाहुण्यांचे आगमन होणार आहे. या पाहुण्यांची नावे ऐकूनच अनेक लहानग्यांची पावले राणीच्या बागेकडे वळण्यासाठी हट्ट धरणार आहेत. या पाहुण्यांमध्ये असणार आहेत, मुलांची आवडती पेपा पिग फॅमिली, माशा अँड द बियर, ब्लुई, ट्वीटी आणि सिल्व्हेस्टर यांच्यासह नानाविध कार्टून्स. विशेष म्हणजे ही सर्व कार्टून्स पानाफुलांपासून साकारली जाणार आहेत. यासाठी निमित्त ठरणार आहे, ते येत्या ०३ फेब्रुवारी ते ०५ फेब्रुवारी २०२३ यादरम्यान आयोजित होणारे वार्षिक उद्यान प्रदर्शन, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित यंदाच्या उद्यान प्रदर्शनाचे आणखी एक आकर्षण असणार आहे ते म्हणजे फुलांपासून साकारलेले ‘जी २०’ चे बोधचिन्ह. त्याचबरोबर ‘जी २०’ सदस्य देशांमधील झाडे फुले आणि भाज्या यांचा समावेश देखील यंदाच्या उद्यान प्रदर्शनात असणार आहेत, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.


महापालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात म्हणजेच राणीच्या बागेत आयोजित होणा-या उद्यान प्रदर्शनाचे उद्घाटन महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या हस्ते दि. ०३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी होणार असून या कार्यक्रमाला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर दि. ०५ फेब्रुवारी २०२३ रोजी होणा-या समारोपीय कार्यक्रम देखील मान्यवरांची उपस्थित असणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दरवर्षी एक मध्यवर्ती संकल्पना घेऊन महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे आयोजित होणारे ‘वार्षिक उद्यान प्रदर्शन’ आता मुंबईची एक ओळख ठरु लागले आहे. लहान मुलांच्या भाव विश्वाचा भाग असणारे कार्टून्स या वर्षीच्या उद्यान प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना असणार आहे. या अंतर्गत पाना – फुलांपासून तयार केलेल्या विविध कार्टून्सच्या प्रतिकृती यंदाच्या उद्यान प्रदर्शनात बघता येणार आहेत. त्याचबरोबर पाना-फुलांपासून तयार केलेले अनेक ‘सेल्फी पॉइंट’ देखील यंदाच्या प्रदर्शनाचे खास आकर्षण असणार आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यासोबतच कुंड्यांमध्ये वाढविलेली फळझाडे व फुलझाडे, फळभाज्यांची झाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोनसाय यांचे अक्षरशः शेकडो प्रकार मुंबईकरांना या प्रदर्शनात पहायला मिळणार आहेत. तसेच मुंबई परिसरात अत्यंत दुर्मिळ असणा-या कृष्णवडासारख्या अनेक दुर्मिळ देशी प्रजातींची झाडे देखील यंदाच्या प्रदर्शनात ‘याची देही, याची डोळा’ बघता येणार आहेत.

कोविड प्रादुर्भावामुळे दोन वर्षाच्या खंडानंतर होत असलेले यंदाचे उद्यान प्रदर्शन हे अधिक संस्मरणीय व्हावे, यासाठी महापालिकेच्या उद्यान खात्यातील अधिकारी व कर्मचारी अक्षरशः दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. याच मेहनतीतून पाना- फुलांपासून तयार केलेल्या विविध कार्टून्सच्या प्रतिकृतींसह विविध प्रकारच्या प्रतिकृती या प्रदर्शनास अनुभवायला मिळणार आहेत, अशी माहिती या निमित्ताने  जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

हे पण वाचा :- 

समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात… खाजगी ट्रॅव्हल्स झाली पलटी 25 ते 30 प्रवासी जखमी

Comments are closed.