Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुल येथे होणाऱ्या सुरजागड लोह प्रकल्पाच्या मालधक्क्याला स्थानिकांचा प्रचंड विरोध.

मालधक्क्याचे काम तात्काळ थांबवा, अन्यथा तीव्र जनआंदोलनाचा मुलवासियांचा इशारा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुल,19, सप्टेंबर :- सुरजागड लोहखनिज प्रकल्पातील कच्चा लोहा देशात इतरत्र पाठविण्याकरिता मुल येथील रेल्वे स्थानकातील डम्पिंग यार्डचा वापर होणार आहे. यामुळे मूल शहरात दररोज ४०० ते ५०० ट्रक येणार आहेत. आणलेला कच्चामाल डम्पिंग यार्ड मध्ये साठवून तो रेल्वेने बाहेर पाठवणार आहेत. मुल शहर हे पर्यावरण दृष्ट्या अतिशय सुंदर असून या क्षेत्राला ताडोबा बफर झोन लागून आहे. रेल्वे स्थानकाजवळच एक मोठे मैदान असून या मैदानात शहरातील लहान पासून मोठ्या पर्यंतचे सर्वच नागरिक व्यायाम, योगासने, मॉर्निंग वॉक करत असतात तसेच खेळाडूंसाठी हे एकमेव मैदान आहे. मैदानालाच लागून महाविद्यालय व लहान मुलांची शाळा आहे. बौद्ध धर्मियांचे व हिंदू धर्मियांचे बौद्ध टेकडी व शिव टेकडी पवित्र स्थळ लागून असल्याने या ठिकाणी जिल्ह्यातील बौद्ध बांधव व हिंदू बांधव भेट देण्याकरिता मोठ्या संख्येने येत असतात. सध्यास्थितीत मूल शहराचे वातावरण अतिशय पोषक व प्रदूषण मुक्त असून डम्पिंग यार्डमुळे संपूर्ण परिसराला प्रदूषणाची झळ पोहोचेल व येथील नागरिकांचे आरोग्य मोठ्या प्रमाणात धोक्यात येईल. ताडोबा बफर झोन क्षेत्र मुल शहराला लागूनच असल्यामुळे येथील वन्य प्राण्यांनासुद्धा डम्पिंग यार्डच्या प्रदूषणाचा त्रास होईल.

मालधक्का झाल्यामुळे संपूर्ण शहर व आजूबाजूचा परिसर प्रदूषणाच्या विळख्यात जाऊन भविष्यात या शहराला मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकते. ही समस्या अतिशय गंभीर असून यावर प्रशासकीय स्तरावरून तात्काळ निर्णय घेऊन सदर होणाऱा मालधक्का तात्काळ बंद करावा किंवा इतरत्र हलवावे या मागणीला घेऊन मूल शहरातील विविध राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी, व्यापारी असोसिएशन, सामाजिक संघटनेंनी व शहरातील जनतेने प्रशासनाला निवेदन दिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जर वरील मागणी तात्काळ मान्य झाली नाही तर मूल शहरातील व तालुक्यातील संपूर्ण जनता येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन करेल असा गंभीर इशारा संबंधित शासन व प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदन देताना मुल येथील गुडमॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य, राजकीय पक्ष प्रतिनिधी, व्यापारी संघटना,तालुक्यातील विविध सामाजिक संघटना, व शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आलापल्ली ते आष्टी महामार्गाचे मजबूत दर्जेदार रस्ता बांधकाम केल्या शिवाय प्रकल्पाची सर्व जडवाहने तात्काळ बंद करा

हत्तीचे स्थानांतरण थांबवा; उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल..

Comments are closed.