Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

काँग्रेसचे ज्येष्ठे नेते एकनाथ गायकवाड यांच्या निधनाबद्दल अनेक मंत्र्यांनी केली श्रद्धांजली अर्पण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठे नेते एकनाथराव गायकवाड यांना श्रद्धांजली

समाजकारण-राजकारणातील दोन पिढ्यांचे मार्गदर्शक असे ज्येष्ठ नेतृत्व माजी राज्यमंत्री, माजी खासदार एकनाथराव गायकवाड यांच्या निधनामुळे हरपले आहे. त्यांच्या नेतृत्वाची पोकळी जाणवत राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते एकनाथराव गायकवाड यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, समाजकारणात रमलेल्या ज्येष्ठ नेते गायकवाड यांनी दोन पिढ्यांसाठी मार्गदर्शक असे काम केले आहे. धारावी आणि मुंबईतील जनमानसाशी जोडून घेऊन त्यांनी विधिमंडळात आणि संसदेतही उत्कृष्ट असे काम केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर त्यांची श्रद्धा होती. त्यांचा उत्तम जनसंपर्क होता. लोकाभिमुख विकास कामांना चालना देताना त्यांनी सर्वसमावेशक राजकारणाचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. त्यांच्या निधनामुळे दोन पिढ्यांसाठी मार्गदर्शक असे ज्येष्ठ नेतृत्व हरपले आहे. त्यांची पोकळी निश्चितच जाणवत राहील. ज्येष्ठ नेते एकनाथराव गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची श्रद्धांजली

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

माजी खासदार, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड मूळचे सातारा जिल्ह्याचे होते. व्यवसायानिमित्त ते मुंबईत आले. धारावी सारख्या भागात त्यांनी मोठे सामाजिक कार्य केले. कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जाणारे नेते होते. आमदार, खासदार म्हणून प्रतिनिधीत्व करण्याची जबाबदारी जनतेने मोठ्या विश्वासाने त्यांच्यावर सोपवली होती.

काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते.

वंचित, उपेक्षित बांधवांच्या हक्कांसाठी लढणारा हक्काचा माणूस आज काळाच्या पडद्याआड गेला. अशा शब्दांत सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी माजी खासदार, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांना श्रद्धांजली वाहिली.

सहकार मंत्री श्री. पाटील म्हणाले
युवक काँग्रेसपासून सुरू झालेली त्यांची राजकीय कारकीर्द आमदार, राज्यमंत्री म्हणून आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सामाजिक न्याय, कामगार,गृहनिर्माण खात्याचे कामकाज पहिले , खासदार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष अशी त्यांची राजकीय कारकीर्द बहरत गेली. माजी खासदार, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

निष्ठावान व लोकप्रिय नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले!

एकनाथ गायकवाड यांना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भावपूर्ण श्रद्धांजली

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष, माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे निष्ठावान,अनुभवी व लोकप्रिय नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दांत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

एकनाथ गायकवाड यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करून थोरात म्हणाले की, तरूण वयात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणारे एकनाथ गायकवाड शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहिले. सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते सतत कार्यरत असतं. जनतेला सहज उपलब्ध असणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. धारावीतील जनतेने त्यांना तीन वेळा आमदार आणि दोनवेळा खासदार म्हणून निवडून दिले होते. राज्य मंत्रिमंडळातही त्यांनी विविध खात्यांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती. पक्ष संघटनेतही त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदा-या पार पाडल्या. अत्यंत कठिण काळात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. दलित चळवळीतही ते सक्रीय होते. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाने सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व गमावले आहे.एकनाथ गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या कठिण प्रसंगी आम्ही सर्व गायकवाड कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत असे श्री.थोरात म्हणाले.

एकनाथराव गायकवाड यांच्या निधनानं सर्वसामान्यांचा बुलंद आवाज हरपला

— सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी मंत्री व माजी खासदार सन्माननीय एकनाथराव गायकवाड यांच्या निधनानं सर्व सामान्य, वंचित, उपेक्षित बांधवांच्या हक्कांसाठी भक्कमपणे लढणारा बुलंद आवाज हरपला आहे, अशी शोक संवेदना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

एकनाथराव गायकवाड यांनी समाजकारण करताना सर्वसामान्यांचे प्रश्न आपले समजून त्यांना वाचा फोडण्याचे कार्य केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे ते निष्ठावंत नेतृत्व होते. काँग्रेसच्या विचारधारेशी आजीवन प्रामाणिक राहणाऱ्या गायकवाड यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. आम्ही सर्वजण गायकवाड साहेबांच्या कुटुंबियांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी आहोत असे देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Comments are closed.