Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांचा लाभ ३ लाखांपेक्षा अधिक मुंबईकरांनी घेतला

१०६ ठिकाणी कार्यरत आहेत दवाखाने

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई 4 फेब्रुवारी :-बृहन्मुंबई महानगरपालिकेने सुरु केलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ उपक्रमातील लाभार्थी संख्येने ३ लाखांचा टप्पा आज ओलांडला आहे. मुंबईत आजघडीला या योजनेतंर्गत १०६ ठिकाणी दवाखाने कार्यरत आहेत. लाभार्थ्यांचा वाढता आकडा पाहता या योजनेला मुंबईकरांनी भरघोस प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट होत आहे.

वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेचे लोकार्पण करण्यात आले होते. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या निर्देशानुसार व उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचा सातत्याने विस्तार करण्यात येत असून सध्या १०६ ठिकाणी आपला दवाखाने कार्यरत आहेत. दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ रोजी १ लाख तर दिनांक ७ जानेवारी २०२३ रोजी २ लाख लाभार्थ्यांचा आकडा गाठण्यात आला होता. आज ३ लाख लाभार्थ्यांची संख्या पूर्ण झाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आपला दवाखान्यांमधून आतापर्यंत ३ लाख ०१ हजार ०७५ नागरिकांनी विविध सुविधांचा लाभ घेतला आहे. यापैकी दवाखान्यांमधून २ लाख ८८ हजार ०२० रुग्णांनी मोफत वैद्यकीय तपासणी व मोफत औषधोपचार यांचा लाभ घेतला आहे. तर, पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक केंद्र येथे १३ हजार ०५५ रुग्णांनी दंतचिकित्सा, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, जनरल फिजिशियन, त्वचारोग तज्ज्ञ अशा उपचार सुविधांचा लाभ घेतला आहे.

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेद्वारे मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी यासह १४७ प्रकारच्या रक्त चाचण्यांची सेवा मोफत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या व्यतिरिक्त क्ष-किरण (एक्स-रे), सोनोग्राफी इत्यादी चाचण्यांकरिता पॅनलवरील डायग्नॉस्टिक केंद्रांद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दरात संबंधित वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्याचबरोबर विशेष तज्ज्ञांच्या सेवा देखील पॉली क्लिनिक व डायग्नॉस्टिक सेंटरद्वारे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. आपले दवाखाने हे प्रामुख्याने सकाळी ७ ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते रात्री १० या कालावधीदरम्यान कार्यरत आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या दवाखान्यांमधून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे व टॅब आधारित पद्धतीने सॉफ्टवेअरच्या माध्यमातून रुग्णांची माहिती, आजाराचा तपशील, औषधांचा साठा व वितरण तसेच संदर्भित केलेल्या निदान सुविधा यांचा तपशिल नोंदविण्यात येत आहे. यामुळे आपल्या दवाखान्यांचे कामकाज हे विनाकागद अर्थात पेपरलेस पद्धतीने व पर्यायाने पर्यावरणपूरक होत आहे, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.

हे पण वाचा :-

Comments are closed.