Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात ९ नगरपंचायतीं पैकी सिरोंचात आविसं,कुरखेड्यात भाजपची एक हाती सत्ता तर अहेरीत त्रिशंकू

६ नगरपंचायतींमध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्व...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली,दि २० जानेवारी : जिल्ह्यातील ९ नगरपंचायतीं पैकी सिरोंचात आविसची तर कुरखेड्यात भाजपची एक हाती सत्तेची चावी मिळाली असून अहेरीत सद्या त्रिशंकू परिस्थिती दिसून येत आहे. सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीला ६ नगर पंचायतींमध्ये मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिल्याने वर्चस्व कायम राहिले असले तरी एटापल्ली नगर पंचायतीमध्ये सत्तेची चावी अपक्ष आणि आदिवासी विद्यार्थी संघाच्या हातात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नगरपंचायतींच्या निवडणुकी दरम्यान शिवसेनेने काही नगरपंचायतींमध्ये काँग्रेसशी, तर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केली होती. मात्र, शिवसेनेला केवळ कुरखेडा व मुलचेरा या दोन ठिकाणी अनुक्रमे ५ आणि ४ जागा जिंकता आल्या. अहेरी व सिरोंचा येथे शिवसेनेला प्रत्येकी दोन, तर भामरागडमध्ये एक जागा मिळाली. कोरची, धानोरा व चामोर्शी या नगर पंचायतींमध्ये शिवसेनेला, तर अहेरी, मुलचेरा आणि सिरोंचा नगर पंचायतीत काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. भाजप स्वबळावर लढून अस्तित्व कायम ठेवले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पूर्वोत्तर धानोरा व कुरखेडा नगर पंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी शून्य राहिली, तर कोरचीत केवळ एक जागा पदरात पडली. प्रत्येक नगर पंचायतीमध्ये १७ जागांसाठी निवडणूक झाली. त्यात धानोरा नगर पंचायतीत काँग्रेसने सर्वाधिक १३ जागा जिंकून एकहाती सत्ता प्रस्थापित केली. व्यापारिकदृष्ट्या महत्वाच्या आणि लोकसंख्येने मोठ्या असलेल्या चामोर्शी नगर परिषदेत काँग्रेसने ८, तर राष्ट्रवादी काँग्रेसने ५ जागा जिंकल्या. तेथे भाजपच्या प्रमुख नेत्यांचा पराभव होऊन केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले. भाजपचे आमदार डॉ.देवराव होळी यांचा चामोर्शी हा गृहतालुका आहे. परंतु त्यांच्या पदरी निराशा आली. कुरखेडा येथे भाजपने ९ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले. तेथे शिवसेना-काँग्रेस आघाडी होती. शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या ताकदीमुळे शिवसेनेला ५ जागा मिळाल्या, तर काँग्रेसने ३ जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला येथे मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कुरखेड्यात भाजपचे आमदार कृष्णा गजबे, सहकार नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे यांचे प्रयत्न फळाला लागल्याचे दिसून आले. कोरचीमध्ये ८ जागा जिंकून काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला. भाजपने तेथे ६ जागांवर विजय मिळविला. राष्ट्रवादी काँग्रेसला एक, तर अपक्षांनी दोन जागा जिंकल्या.

अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी, मुलचेरा, एटापल्ली, सिरोंचा आणि भामरागड या नगर पंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मरावबाबा आत्राम आणि भाजपचे माजी मंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अहेरीत भाजपने सर्वाधिक ६ जागांवर विजय मिळविला. राष्ट्रवादीला ३, तर सोबत असलेल्या शिवसेनेला २ जागा मिळाला. येथे आदिवासी विद्यार्थी संघाने ५ जागा जिंकून सत्तेची चावी आपल्याकडे ठेवली आहे. मुलचेरा नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसला ६, शिवसेनेला ४, अपक्ष २ आणि भाजपने १ जागा पटकावली.

सिरोंचामध्ये आदिवासी विद्यार्थी संघाने सर्वाधिक १० जागा जिंकून सत्ता प्रस्थापित केली. राष्ट्रवादी काँग्रेसला ५, तर शिवसेनेला २ जागा मिळाल्या. एटापल्लीत काँग्रेसला ५, राष्ट्रवादी काँग्रेसला ३, अपक्ष ४, आदिवासी विद्यार्थी संघाला २, तर भाजपला ३ जागांवर विजय संपादित करता आला. भामरागडमध्ये काँग्रेसला २, राष्ट्रवादी काँग्रेसला ३, भाजप ५, शिवसेना १, अपक्ष ३, आविसने ३ जागांवर विजय प्राप्त केला.

सर्वाधिक ३९ जागा काँग्रेसला

गडचिरोली जिल्ह्यातील ९ नगर परिषदांमध्ये प्रत्येकी १७ अशा एकूण १५३ जागांसाठी निवडणुकीत सर्वाधिक ३९ जागा जिंकून काँग्रेस पक्ष सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. भाजपला ३६, राष्ट्रवादी काँग्रेसला २६, आदिवासी विद्यार्थी संघ २४, शिवसेना १४ तर अपक्षांना १४ जागा मिळाल्या आहेत. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश सरचिटणीस डॉ.नामदेव उसेंडी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी आदींनी काँग्रेसला बहुमत मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला आहे.

पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी विकासात्मक कामाच्या चाव्या आपल्याकडेच असल्याचे प्रचारादरम्यान सांगूनही मतदारांनी नाकारल्याने बसला मोठा झटका

अहेरी विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील अहेरी, सिरोंचा, एटापल्ली आणि भामरागड या नगर पंचायतींमध्ये जबर फटका बसला आहे. मुलचेरा नगर पंचायतीत राष्ट्रवादीला ६ जागा मिळवता आल्या. अहेरी, एटापल्ली आणि भामरागडमध्ये प्रत्येकी ३ जागा आणि सिरोंचात ५ जागांवर राष्ट्रवादीला समाधान मानावे लागले. शिवसेनेशी आघाडी करुनही राष्ट्रवादीच्या पदरात घोर निराशा आली आहे.

एकनाथ शिंदेचा फारसा प्रभाव नाही

राज्याचे नगरविकास मंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांसाठी जवळपास सर्वच ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. परंतु त्यांना अपेक्षेएवढे यश मिळाले नाही. शिवसेनेने काही ठिकाणी काँग्रेसशी, तर काही ठिकाणी राष्ट्रवादीशी आघाडी केली होती. या दोन पक्षांच्या भरवश्यावर शिवसेनेला केवळ १४ जागा मिळवता आल्या. मात्र, दक्षिण गडचिरोलीत शिवसेनेने एन्ट्री केली, हे महत्वाचे मानले जात आहे.

आदिवासी विद्यार्थी संघाची दमदार एन्ट्री

माजी आमदार दीपक आत्राम आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात आदिवासी विद्यार्थी संघाने अहेरी विधानसभा क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. आविसने सिरोंचा नगर पंचायतीत तब्बल १० जागा जिंकून सत्ता प्रस्थापित केली, तर अहेरी या धर्मरावबाबा आत्राम यांच्या गृहशहरात ५ जागा जिंकून धोबीपछाड केले आहे. भामरागड व एटापल्ली येथे आविसंचे अनुक्रमे ३ व २ उमेदवार विजयी झाले आहेत.

हे देखील वाचा : 

‘एमटीडीसी’ चे ‘जबाबदार पर्यटन’ : एक नवीन संकल्प

 

 

3 Comments
  1. Khushal Sudhakar Dongre says

    जय भीम!
    खूप सुंदर वार्ता एडिटिंग केलेली आहे. अत्यंत सुबक व सोप्या भाषेत अनुवादित करून प्रत्येक पक्षाची ताकद कशी नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीत प्रणपणाला लावलेत यावर लिखाणातून प्रकाश टाकल्याचे दिसते.
    अशाच प्रकारे आपल्या क्षेत्रातील समस्या आणि अनेक समस्यांना तोंड देत असणारे क्षेत्रातील नागरिक त्रस्त झाले आहेत. यावर सतत कार्य करण्याची गरज आहे. समस्या आपल्या लेखनातून उचलून धरा.
    फक्त बातम्या पुरताच मर्यादित लिखाण ठेवू नका.

    आपला शुभचिंतक
    खुशाल डोंगरे

    1. loksparshadmin says

      डोंगरे साहेब ,
      आमच्या साध्या लिखाणातून राजकीय घडामोडी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे आणि तसेच वाचका पर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही नक्कीच नक्कीच प्रयत्नशील आहोत ,
      आपल्या हि समश्या लिहिण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत ,
      धन्यवाद …..

Comments are closed.