Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘टॉयमॅन’ अरविंद गुप्तांनी घडवली खेळण्यांच्या दुनियेची सफर.मुलांनी अनुभवला ‘टॉयमॅन’ अरविंद गुप्तांचा खेळण्यांचा तास.

Get real time updates directly on you device, subscribe now.

मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे ‘खेल खेल में’
राष्ट्रीय विज्ञान खेळणी, गेम डिझाईन स्पर्धेचे उद्घाटन
.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे-1-नोव्हेंबर:- कागदापासूनची फुलपाखरे-पक्षी… काडीपेटी-दोऱ्यापासूनची आगगाडी… झाडाच्या पानांतून साकारलेला वाघ-सिंह… चप्पल-खराट्याच्या काड्यांपासूनचे सुदर्शन चक्र… पिंपळाच्या पानातून डोकावणारी मांजर… स्लीपर चपलातून निर्मिलेल्या गणितीय आकृत्या… आदी गोष्टी प्रात्यक्षिकांतून दाखवत टाकाऊ वस्तूंमधून वैज्ञानिक खेळणी साकारण्यात प्रसिद्ध संशोधक पद्मश्री अरविंद गुप्ता यांनी खेळण्यांच्या दुनियेची सफर घडवली. गुप्तांच्या या ‘खेळकर’ तासाने मुले चांगलीच भारावून गेली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पुण्यातील भारतीय विद्या भवन संचालित मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्राच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘खेल खेल में’ : टॉय अँड गेम डिझाईन स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे! प्रसंगी विद्या भवन, पुणेच्या अध्यक्षा लीना मेहेंदळे, मानद सचिव नंदकुमार काकिर्डे, विज्ञान शोधिका केंद्राचे मानद संचालक अनंत भिडे, उपसंचालक नेहा निरगुडकर, भारती बक्षी यांच्यासह विज्ञान क्षेत्रातील विविध मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. झूममीटद्वारे झालेल्या या सोहळ्यात जवळपास ३०० जण सहभागी झाले होते. तर विज्ञान शोधिका केंद्राच्या फेसबुक पेजवरून (www.facebook.com/exploratorypune) हा सोहळा अनेकांनी लाईव्ह पहिला. सायली देव यांनी सूत्रसंचालन केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अरविंद गुप्ता म्हणाले, “समृद्ध निसर्ग लाभल्याने भारतात खेळणी बनवण्याची मोठी परंपरा आहे. त्याला साजेशी खेळणी आपण बनवावीत. मुलांचे लहानपण खेळण्यात गेले नाही, तर पुढे ती उपद्रवी बनतात. ‘सुंदर सलोने, भारतीय खिलोने’सारखी पुस्तके मार्गदर्शक आहेत. भवतालच्या प्रत्येक गोष्टीतून खेळणी बनवणे शक्य आहे. आपण तसा विचार केला पाहिजे. दक्षिण भारतात नारळाच्या फांद्या, करवंट्यांपासून शेकडो खेळणी बनवली जातात.” मुलांनी आपल्यातील कल्पक विचार प्रत्यक्षात उतरवून मजेशीर खेळणी बनवावीत. खेळता-खेळता विज्ञान आत्मसात करावे, असे लीना मेहंदळे यांनी नमूद केले.

असे आहे स्पर्धेचे स्वरूप…

मुलांमधील कल्पक-कलात्मक दृष्टीला चालना देऊन भारतीय बनावटीची खेळणी, गेम्स बनविण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजिली आहे. सर्व माहिती kkm.exploratory.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मुलांच्या सर्जनशीलतेला आव्हान देण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरेल. भारतीय संस्कृती, पौराणिक कथा, ऐतिहासिक किंवा भौगोलिक संकल्पनेवर आधारित खेळणी, गेम्स आणि प्रकल्पांची नोंदणी करता येईल. नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन येणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना संस्थेच्या वतीने सहकार्य केले जाणार आहे. ही स्पर्धा कनिष्ठ (५वी ते १०वी) आणि वरिष्ठ (११ वी व त्यापुढील) अशा दोन गटात होईल. संकल्पन आणि मूर्त स्वरूप अशा दोन टप्प्यात ही स्पर्धा होईल. संकल्पना पाठविण्याची अंतिम तारीख १० डिसेंबर, तर संपूर्ण प्रकल्प पाठविण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०२१ अशी आहे. सहभागी खेळणी, गेम्सचे ऑनलाईन प्रदर्शन राष्ट्रीय विज्ञान दिवशी अर्थात २८ फेब्रुवारी २०२१ रोजी भरवण्यात येईल. विजेत्यांना दोन लाखांपर्यंतची बक्षिसे देण्यात येतील. विद्यार्थ्यांना खेळणी, गेम्स बनविण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. ऑनलाईन अभ्यासक्रम, कार्यशाळा, तज्ज्ञ व्याख्याने होतील. गेम डिझाईन, विचार कौशल्य, खेळण्यांची निर्मिती, फ्रॅब्रिकेशन तंत्रज्ञान, प्रोग्रामिग, इलेक्ट्रॉनिक आदीबाबत शिक्षण मिळेल. समाज माध्यमांवर विद्यार्थ्यांना मोफत सल्ला आणि विद्यार्थी- शिक्षक संवादांचे आयोजन केले जाणार आहे. शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते, शिक्षक यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

अरविंद गुप्तांच्या वाणीतून…

  • भारतीय खेळणी शाश्वत, जुनी परंपरा.
  • निसर्गातील प्रत्येक गोष्टीत खेळणी लपलेली.
  • विविधतेने नटलेल्या भारतातील खेळणी पर्यावरणपूरक.
  • टाकाऊतून बनलेली खेळणी लाखो गरिबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवताहेत.
  • खेळण्याच्या वैविध्यता पिढ्यांचा वारसा.
  • पाश्चिमात्य देशांचे अनुकरण नको.
  • झाड, पालापाचोळा, कचरा हे खेळणी बनवण्याचा कच्चा माल.
  • खेळण्यांतून वैज्ञानिक संकल्पना समजण्यास मदत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.