Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ स्फोटकं भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

मुंबई डेस्क, दि. 25 फेब्रुवारी:  प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ संशयित गाडी आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्कॉर्पिओ गाडी सापडली असून घातपाताच्या उद्देशाने ठेवल्याचा संशय आहे. मुंबई पोलीस आणि एसएसजीची सिक्युरिटी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सहआयुक्त विश्वास नांगरे पाटीलही घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबई पोलिसांची फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून तपासणी केली जात आहे.

संबंधित गाडीमध्ये जिलेटिनने भरलेली स्फोटकं असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. याबाबत पोलिसांनी अधिकृत अशी कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार गाडीत स्फोटकं असल्याचं समोर येत आहे. पोलिसांचा सध्या तपास सुरु आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अंबानींच्या बंगल्याजवळ संबंधित गाडी बराच वेळ थांबली होती. पोलिसांनी पार्किंगच्या अनुषंगाने जरी कारवाई केली त्यावेळी हा सगळा प्रकार उघड झाला. आता सगळ्या यंत्रणा परिसरात पोहोचल्या आहेत. संबंधित परिसर हा व्हिआयपी आहे. या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त असतो.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अंबानी यांना यापूर्वीच केंद्रीय सुरक्षा दलाकडून सुरक्षा देण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबई पोलिसांची सुरक्षा आहे. ही सुरक्षा तीन ते चार पद्धतीत आहे. इतकी सुरक्षा असूनही संबंधित परिसरात अशाप्रकारे गाडी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाला अतिशय गांभीर्याने घेतलं आहे.

अंबानी यांना धमकीचे पत्र

अंबानी यांना याआधी धमकीचे पत्र आले होते, अशी माहिती समोर येत आहे. त्यांच्या नरिमन पॉईंट येथील कार्यालयात त्यांना धमकीचे पत्र आले होते. त्यानंतर त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. त्यांच्या बंगल्यापर्यंत ही सुरक्षा व्यवस्था आहे. सरकारकडून गेल्या सात ते आठ वर्षांपासून त्यांना सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे.

गाडीत धमकीचे पत्र

गाडीत स्फोटकांसोबत धमकीचे पत्र देखील आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित परिसर हा व्हिआयपी परिसर आहे. विशेष म्हणजे ज्या रोडवर गाडी उभी होती त्या रस्त्यावर सर्व मंत्री, मोठमोठे उद्योगपती यांची ये-जा असते.

हे नेमकं कुणी केलंय? ते शोधून काढू गृहराज्यमंत्री

“मी मुंबई पोलीस आयुक्तांच्या सतत संपर्कात आहे. ती गाडी आम्ही ताब्यात घेतलेली आहे. गाडीची नंबरप्लेटवरील नंबर जरी काढला असला तरी त्याच्या खोलावर जाऊन आम्ही तिथे गाडी सोडणाऱ्याला शोधून काढू. हे नेमकं कुणी केलंय? याच्या मुळाशी कोण आहे? ते निश्चितपणे शोधून काढू. स्थानिक गुन्हे शाखेकडे याचा तपास दिलेला आहे. या एका प्रकरणामुळे कुणीही घाबरुन जाण्याचं कारण नाही”, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

“स्फोटकं आहेत की नाही ते मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण जिलेटिन वगैरे मिळाल्याची माहिती मिळत आहे. याबाबत सविस्तर माहिती मिळाली की आम्ही तुम्हाला माहिती देऊ”, असं देखील शंभूराज देसाई यांनी सांगितलं.

“मुंबईच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीस आणि महराष्ट्र पोलीस सतत अलर्ट असतात. पोलीस यंत्रणा शंभर टक्के सक्षम आहे. अशा एखाद्या प्रकरणामुळे घाबरण्याचं कारण नाही. आम्ही आणखी कडक बंदोबस्त करु”, असंदेखील त्यांनी सांगितलं.

संबंधित गाडी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारा मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया हाऊस या बंगल्याच्या गेटसमोर आली होती, अशी माहिती समोर आली आहे. गाडीत जिलेटिनच्या 25 काड्या सापडल्याची माहिती समोर येत आहे.

Comments are closed.