Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोनसरी येथील लोहप्रकल्प निर्माण कामाचे मोठ्या थाटात व्यवस्थापकीय संचालक बि. प्रभाकरन यांच्या हस्ते शुभारंभ

कंपनीला जमीन देणार्‍या ३६ जणांना नोकरीचे नियुक्तीपत्र व्यवस्थापकीय संचालक प्रभाकरन यांच्या हस्ते प्रदान.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मला गावातलाच समजा… मी येथे नवीन असलो, तरी आता या प्रकल्पामुळे आपण सगळे एका परिवाराचे सदस्य झालो आहोत. आता समृद्धी, सुख, शांती, संपन्नतेकडे नेणारा पुढचा प्रवास आपल्याला एकत्रच करायचा आहे. त्यामुळे मला परका न समजा आपल्या गावातलाच एक ग्रामस्थ समजा, असे भावनिक आवाहन करत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रभाकरन यांनी उपस्थित ग्रामस्थांची मने जिंकली.

गडचिरोली, दि. १९ नोव्हेंबर : अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे. गावात शेती करत होतो. एका ट्रॅक्टरपासून सुरुवात करत सर्वांच्या सहकार्याने व्यावसायिक क्षेत्रात पाय घट्ट रोवले. मित्र, स्नेही, सहकारी व तुमच्यासारख्या जनतेच्या आशीर्वादाने आज आमच्या कंपनीचा व्यवसाय १० ते १५ हजार कोटीपर्यंत पोहोचला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

माझा एकट्याच्या नव्हे, तर सर्वांच्या विकासावर विश्वास आहे. म्हणून आता कोनसरीत प्रारंभ होणार्‍या सुरजागड लोहप्रकल्पाच्या माध्यमातून आपण सारेच विकासाच्या मार्गाने यशस्वी वाटचाल करू, असे प्रतिपादन लॉयड मेटल्स एनर्जी लिमीटेड तथा त्रिवेणी अर्थमुव्हर्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रभाकरन यांनी केले.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली जिल्ह्यातील बहुप्रतीक्षीत सुरजागड लोहप्रकल्पाच्या पायाभरणीचा प्रारंभ शुक्रवार (ता. १९) कोनसरी येथे करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. या कार्यक्रमाला त्रिवेणी अर्थमुव्हर्स कंपनीचे संचालक अतुल खाडिलकर, सरपंच श्रीकांत पावडे, गोमाजी कुळमेथे, भोगेकार पाटील, भूमीधर शेतकरी समितीचे अध्यक्ष बंडू बारसागडे, पोलिस पाटील यशवंत मानापुरे, माजी उपसरपंच चंदू बोनगीरवार, महिला बचतगटाच्या अध्यक्ष कल्पना चांदेकर, उपसरपंच रतनराज आक्केवार, ग्रामपंचायत सदस्य राकेश दंडीकवार, विजय सिडाम, यशवंत मानापुरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय कुमरे, ग्रामपंचायत सदस्य सुनीता कोवे, गीता गर्दे, सविता आत्राम, वैशाली करपते, ललिता मोहुर्ले, तुकाराम कन्नाके आदी उपस्थित होते.

 

पुढे मार्गदर्शन करताना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रभाकरन म्हणाले की, मी इथे नवीन आहे. मी बोलणार नाही, तर काम करणार. लोहप्रकल्पासाठी ग्रामस्थांनी फक्त जमीनच नाही तर या माध्यमातून तुम्ही सारे आता माझ्या आयुष्याशी जुळले आहात.

या उद्योगात अनेकांना रोजगार देतानाच महिलांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. त्यासाठी महिलांच्या सहकारी संस्था स्थापन करून त्यांना वस्त्रोद्योग व इतर उद्योगांसाठी मदत करण्यात येईल. गडचिरोलीत जनीन, पाणी, खनिज आहे. त्याचा योग्य व समतोल वापर करून आपण विकास साध्य करू शकतो.

जमशेदपूर येथे अनेक वर्षांपूर्वी उद्योग निर्माण झाल्याने तिथे तुम्हाला दारिद्य्र रेषेखाली कुणीच दिसणार नाही. आज तेथील नागरिकांची मुले परदेशात शिकत आहेत. इथे मुलांसाठी मोफत इंग्रजी शिक्षण सुरू करून त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना येथेच योग्य तो रोजगार कसा मिळेल, यासाठी नियोजन करणार आहे. येथे काम लवकर सुरू करण्यासाठी सर्व तयारी केली आहे.

आमची त्रिवेणी कंपनी म्हणजे आम्ही, कारखान्यात काम करणारे अधिकारी, कर्मचारी व स्थानिक नागरिक असा तीन घटकांचा संगम आहे. त्यामुळे मी नव्हे, तर तुम्हीच काम करणार आहात. मला इथल्या परिसराचा झपाट्याने विकास करायचा आहे म्हणून हा प्रकल्प लोकसहभागातूनच चालविणार आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमात सरपंच श्रीकांत पावडे यांनी ज्यांची जमीन कंपनीने अधिग्रहीत केली आहे त्यांना दुसर्‍या ठिकाणी नोकरी न देता येथेच द्यावी तसेच नर्सरी ते बारावीपर्यंतच्या इंग्रजी माध्यमातील मोफत शिक्षणाची सोय करावी, अशी मागणी केली. या कार्यक्रमादरम्यान कंपनीला जमीन देणार्‍या ३६ जणांना नोकरीचे नियुक्तीपत्र व्यवस्थापकीय संचालक प्रभाकरन यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. दरम्यान आमदार डॉ. देवराव होळी यांनीही या सोहळ्याला भेट देत प्रकल्पासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रवी ओल्लालवार व इतर पदाधिकारी होते.

हे देखील वाचा : 

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट आणि कोकणातील कातळशिल्पे या संकल्पनाचा जागतिक वारसा म्हणून युनेस्कोकडून स्वीकार

ग्रामपंचायतींमधील ७ हजार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबरला मतदान

सुप्रीम कोर्टाचा मुंबई हायकोर्टाला झटका; ‘लैंगिक अत्याचारात स्पर्श केला नाही तरी पॉक्सोचा गुन्हा दाखल होणार’

 

 

Comments are closed.