Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गावाच्या सर्वांगीण विकासात विद्यापीठाची भूमिका मोलाची -जेष्ठ समाजसेवक देवाजी तोफा

गडचिरोलीत गोंडवाना विद्यापीठाचा 'विद्यापीठ आपल्या गावात' उपक्रम सुरू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली दि, २८ मार्च :  प्राथमिक ते उच्च शिक्षणा संदर्भात सरकारने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० लागू करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या शैक्षणिक धोरणानुसार उच्च शिक्षणातील विद्यार्थी गळती व वाढ यावर चर्चा होत आहे. मात्र, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम भागातील अनेक गावातील युवकांमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण दिसून येत नाही तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांचे शिक्षण हे अर्ध्यातून सुटलेले असते. ही बाब लक्षात घेऊन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या संकल्पनेतून’विद्यापीठ आपल्या गावात’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

राज्यातील हा पहिला प्रयोग असून रात्रीच्या शाळेप्रमाणे हा उपक्रम राबविण्यात येत आहे.  

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

धानोरा तालुक्याअंतर्गत जांभळी येथे ‘आदर्श पदवी महाविद्यालयाद्वारे आयोजित ‘विद्यापीठ आपल्या गावात’ या उपक्रमाचे उद्‌घाटन २७ मार्चला सायंकाळी जेष्ठ समाज सेवक देवाजी तोफा यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे , विशेष अतिथी प्र- कुलगुरू डॉ .श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन,संचालक परीक्षा व मूल्यमापन डॉ. अनिल चिताडे,नवसंशोधन केंद्राचे संचालक डॉ .मनीष उत्तरवार, विद्या बोकारे, विशेष अतिथी जांभळी ग्रामपंचायतचे सरपंच विलास कुंबरे ,उपसरपंच पुरुषोत्तम बावणे ,वामन लोहमबरे, चंद्रकुमार उसेंडी, मधुकर मडावी, विलास दरडे आदी मान्यवर उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

विद्यापीठ आपल्या गावात या उपक्रमाचे उद्घाटक ज्येष्ठ समाजसेवक देवाजी तोफा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना गोंडवाना विद्यापीठाचे उपक्रम अतिशय समाज उपयोगी आहेत. गोंडवाना विद्यापीठाला लाभलेले कुलगुरू हे गडचिरोली जिल्ह्यासाठी मार्गदर्शक आहेत. अधिकारी येथील आणि जातील परंतु त्यांनी निर्माण केलेल्या कामाची पावती सातत्याने प्रत्येक माणसापर्यंत टिकून राहते. त्याचेच एक मोठे उदाहरण म्हणजे गोंडवाना विद्यापीठाने निर्माण केलेला हा दूरदृष्टीकोण उपक्रम विद्यापीठ आपल्या गावात होय. त्यामुळे प्रत्येक गावाच्या सर्वांगीण विकासात विद्यापीठाची भूमिका मोलाची असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

अध्यक्षस्थानावरुन बोलतांना गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे म्हणाले की प्रत्येक माणसाला शिक्षणाचा अधिकार आहे शिक्षण हे स्वतःच्या सर्वांगीण विकासाकरिता व समाजाच्या विकासाकरिता अतिशय पूरक माध्यम असणारं शस्त्र आहे . गावाच्या मागासलेपणावर शिक्षण हे एक मात्र साधन निर्माण व्हावं म्हणून गोंडवाना विद्यापीठाने विद्यापीठ आपल्या गावात या उपक्रमाची जोड निर्माण करून गावाच्या सर्वांगीण विकासामध्ये एक पाऊल पुढे ठेवण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून केलेला आहे. विद्यार्थी विद्यार्थिनींनी या उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून प्रत्यक्ष गावामध्ये विद्यापीठाचे महाविद्यालय सुरू होत असल्याने आता रोजगारापासून वंचित राहण्याची गरज नाही आणि शिक्षणापासून सुद्धा दूर जाण्याची गरज नाही असे ते म्हणाले.
प्र-डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, नवसंशोधन केंद्राचे संचालक डॉ. मनीष उत्तरवार , विलास कुमरे, उपसरपंच पुरुषोत्तम बावणे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

या उपक्रमा अंतर्गत जांभळी ग्रामपंचायतीमध्ये महाविद्यालय सोडलेल्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून त्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्यात आली. त्या विद्यार्थ्यांना पुनर्प्रवेशित करून या उद्घाटन समारंभा नंतर प्रत्यक्ष वर्ग भरून क्लासेस सुरू करण्यात आले. यावेळी शिक्षणापासून दूर गेलेल्या विद्यार्थ्यांना मन परिवर्तन करून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झालेल्या प्रयत्नातून २२ विद्यार्थी प्रवेशित झाले .त्या सर्व विद्यार्थ्यांना फळ रोपटे देऊन त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आला. याप्रसंगी गावातील माजी सरपंच मधुकर जी मडावी यांनी नोटबुक व पेन देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला .

प्रास्ताविक आदर्श पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शशिकांत अस्वले यांनी केले संचालन आदर्श महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.संदीप लांजेवार यांनी तर आभार उन्नत भारत अभियानाचे समन्वयक डॉ. नंदकिशोर माने यांनी केले कार्यक्रमात समारोपनंतर लगेचच बीए पदवी अभ्यासक्रमाच्या तासिकेला सुरुवात करण्यात आली या अभियानाच्या पहिल्या तासिकेचा पहिला वर्ग हा अभ्यागत प्रा. म्हणून डॉ. प्रमोद बोदाने यांनी इतिहास विषयाची सुरुवात करून केला हा उपक्रम संपूर्ण समाजाच्या दृष्टीने एक चर्चेचा केंद्रबिंदू जरी असला तरी जांभळी ग्रामस्थांसाठी एक सुवर्ण पर्वणीच निर्माण करणारा ठरेल यात शंका नाही.

 

 

Comments are closed.