Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

समृद्धी महामार्गावर अपघातात एकाच कुटुंबातील तीन ठार गावात शोककळा

डिग्रस, ता. देऊळगावराजा येथील मांटे कुटुंबातील तीन ठार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

डिग्रस , 4 जून-  समृद्धी महामार्गावर मेहकर तालुक्यातील फर्दापुर जवळ सिमेंट मिक्सर ट्रकच्या धडकेत देऊळगावराजा तालुक्यातील डिग्रस येथील तिघेजण ठार झाल्याची घटना आज दि. 4 जून, रविवारी सकाळी 4.00 वा. सुमारास घडली आहे. डिग्रस येथील मांटे कुटुंबीय टाटा निस्सान क्र. एम. एच. 28 ए झेड 7546 ह्या वाहनाने वाशिम येथे आयोजित असलेला कुटुंबातीलच लग्नसोहळा आटोपून मालेगाव कडून परत येत होते. दरम्यान फर्दापुर नजीकच्या चॅनेल क्र. 286 जवळ वाहन थांबवून, त्यातील तिघे जण लघवी करण्यासाठी जात होते. त्याचवेळी मार्गावरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात सिमेंट मिक्सर ट्रकने त्यांना उडविले.

या अपघातात विजय शेषराव मांटे, वय 48, तुषार गजानन मांटे, वय 38 व ओम विजय मांटे, वय 20 हे तिघेजण ठार झाले आहेत. वाहनात एकूण सहाजण असल्याचीही माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच फर्दापुर पोलीस मदत उपकेंद्राचे पीएसआय शैलेश पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मेहकर येथील सरकारी दवाखान्यात हलविले.तेथे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिघेही मृत झाल्याचे सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तिन्हीही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मेहकर येथील सरकारी दवाखान्यात ठेवण्यात आले आहेत. अपघाताची माहिती मोबाईलद्वारे तसेच समाजमाध्यमातून कळताच डिग्रस गावावर व संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील वडील, मुलगा व पुतण्या ठार झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.ह्यातील विजय मांटे हे विमा कंपनीचे काम करीत असल्याची, तुषार हा अभियंता व ठेकेदारी करीत होता तसेच ओम हा अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

मृतक तुषारची आज एमपीएससीची परीक्षा होती, असेही काही युवकांनी सांगितले आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी एक वाजता डिग्रस येथील स्मशानभूमीत मृतकांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.