Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सीबीएसई बोर्ड दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा होणार जाहीर

शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’आज संध्याकाळी (31 डिसेंबर) सहा वाजता सीबीएसई बोर्ड परीक्षा 2021  ची करतील घोषणा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली, दि. ३१ डिसेंबर : सीबीएसई बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा नववर्षाच्या पूर्वसंध्येला होणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ आज संध्याकाळी सहा वाजता सीबीएसई बोर्ड परीक्षा 2021  ची घोषणा करतील. शिक्षण मंत्र्यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात घोषणा केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

“प्रिय विद्यार्थी आणि पालकांनो, मी सीबीएसई बोर्ड परीक्षा 2021 च्या परीक्षांच्या तारखांची घोषणा आज संध्याकाळी 6 वाजता करणार आहे. लक्ष ठेवा” अशा आशयाचे ट्विट रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी केलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे डोळे घड्याळाकडे लागले आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचा विचार करुन सीबीएसई आवश्यक ती काळजी घेईल. त्यासंबंधी सर्व तयारी सुरु आहे, अशी माहिती शिक्षण मंत्र्यांनी शिक्षकांसोबत झालेल्या व्हर्च्युअल मीटिंगमध्ये दिली होती.

सीबीएसईच्या परीक्षा लेखी पद्धतीनेच होतील, ऑनलाईन नाही

दरवर्षी जानेवारी महिन्यात सीबीएसई बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षा पार पडतात. तर फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत लेखी परीक्षा होतात. 2021 मधील सीबीएसईच्या परीक्षा लेखी पद्धतीनेच होतील, ऑनलाईन नाही, असं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आधीच स्पष्ट करण्यात आले होते.

दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य आहे, याला रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी दुजोरा दिला. परीक्षा फेब्रुवारीच्या आधी होणार नाहीत, अशी ग्वाही शिक्षण मंत्र्यांनी दिली.

कोव्हिडची परिस्थिती लक्षात घेऊन तारखा ठरवण्यात आल्या आहेत. परंतु परिस्थिती हाताबाहेर गेल्यास परीक्षा पुढे ढकलण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, विद्यार्थ्यांचे हित याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असंही पोखरियाल यांनी स्पष्ट केलं. परीक्षांच्या घोषणांनंतर सीबीएसई हॉल तिकीटांचे वितरण करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.