चीन पँगाँग सरोवराच्या परिसरातून सैन्य मागे घेण्याची तयार.
सर्व संघर्षस्थळांवरून ठरावीक मुदतीत सैन्यमाघारी आणि शस्त्रे परत घेण्यासाठी तीन टप्प्यांमधील प्रक्रियेबाबत दोन्ही बाजूंची सर्वसाधारण सहमती झाल्याचे समजते.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क : गेल्या सहा महिन्यांपासून पँगाँग सरोवरच्या पश्चिम भागात घुसखोरी करून ठिय्या मांडून बसलेल्या चीनने अखेर या परिसरातून आपले सैन्य माघारी घेण्याची तयारी दर्शविली आहे. पँगाँग सरोवराच्या फिंगर 8 पर्यंत सैन्य मागे घेऊन जाण्यास चीन तयार आहे. मात्र, भारतीय सैन्यानेही आपल्या मूळ स्थानी परत जावे, अशी अट चीनकडून घालण्यात आली आहे. भारताकडून अद्याप या प्रस्तावाला संमती दर्शविण्यात आलेली नाही.
या प्रस्तावासंदर्भात दोन्ही बाजूंना सकारात्मक वातावरण आहे. दोन्ही बाजूच्या सैन्याकडून या परिसरात तैनात असलेल्या रणगाड्यांच्या तोफांची तोंडे विरुद्ध दिशेला वळवण्यात आली आहेत. हे दोन्ही देशांमधील तणाव निवळत असल्याचे चिन्ह मानले जात आहे.
चीनच्या नव्या प्रस्तावानुसार दोन्ही बाजूच्या सैन्याने उंचावरच्या भागातील रणगाडे आणि चिलखती दल पुन्हा खालच्या भागात न्यावे. जेणेकरून या परिसरात पुन्हा तणावाची परिस्थिती उद्भवता कामा नये, असे चीनचे म्हणणे आहे.लडाखमध्ये थंडीचा हंगाम सुरु झाला असून आगामी काळात येथील तापमान शून्य अंशांच्याखाली जाईल. त्यामुळे या भागात तैनात असलेल्या सैनिकांना खडतर परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. त्यासाठीची चीनकडून आता नरमाईचा सूर लावला जात आहे. मात्र, भारताकडून अद्याप या प्रस्तावावर सहमती दर्शवण्यात आलेली नाही. संवेदनशील ठिकाणांवरील सैन्य तैनातीबाबतची धोरणे अद्याप निश्चित झालेली नाहीत.
कमांडर स्तरावर झालेल्या बैठकीनंतर चीनकडून हा प्रस्ताव देण्यात आला आहे. सर्व संघर्षस्थळांवरून ठरावीक मुदतीत सैन्यमाघारी आणि शस्त्रे परत घेण्यासाठी तीन टप्प्यांमधील प्रक्रियेबाबत दोन्ही बाजूंची सर्वसाधारण सहमती झाली आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी बुधवारी दिली.
Comments are closed.