Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यातील लोह खाणी रद्द करा : अन्यथा मुंबईत बेमुदत ठिय्या आंदोलन करणार

अखिल भारतीय किसान सभेचे राज्य कौन्सिल सदस्य काॅ.अमोल मारकवार यांनी दिला.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली 13 फेब्रुवारी :-सुरजागडसह जिल्ह्यातील मंजूर व प्रास्तावित लोह खाणी तात्काळ रद्द करुन पाचवी अनुसूची, पेसा, वनहक्क आणि जैविक विविधता कायद्यांच्या तरतूदींचे पालन करुन स्थानिक जनतेला न्याय द्यावा. अन्यथा येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान मुंबई येथील आझाद मैदानावर शेकडोंच्या संख्येने ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे राज्य कौन्सिल सदस्य काॅ.अमोल मारकवार यांनी दिला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील पारंपारिक इलाखे, शेकडो ग्रामसभांनी विविध ठराव, निवेदनांद्वारे तसेच मोर्चे, आंदोलन करुन सुरजागड सह जिल्ह्यातील विविध मंजूर आणि प्रास्तावित लोह खाणींना विरोध केलेला असतांनाही हा विरोध पोलिस बळाचा वापर करून दडपून टाकत बळजबरीने रोजगाराच्या नावाने खाणी खोदण्यात येत आहेत. लोह अयस्काच्या बेसूमार वाहतुकीमुळे हजारो हेक्टर शेतीमधील पिकांची नुकसान झाली आहे. शेकडो अपघात होवून नागरिकांना जीव गमवावे लागले आहेत. आदिवासी शेतकऱ्याची आत्महत्या आणि वाहन चालकाकडून आदिवासी महिलेवर बलात्काराचे प्रकरणही या खाणीमुळे घडले असून लोहखाणींमुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होत आहे.अशी टिकाही काॅ.अमोल मारकवार यांनी केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आत्तापर्यंत ग्रामसभा, पारंपारिक इलाखे, विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी वेळोवेळी केलेल्या तक्रारी आणि निवेदनांवर शासनाकडून कोणतेही उत्तर दिले गेले नसून लोह खाणी विरोधात आवाज उठविणाऱ्या सैनू गोटा, रामदास जराते, अमोल मारकवार, शिला गोटा, जयश्री वेळदा, मंगेश नरोटे, मंगेश होळी यांच्या सारख्या कार्यकर्त्यांवर शासनाने विविध गुन्हे दाखल करुन आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

लोह कंपनी प्रशासनाच्या दबावाखाली शासनाने अशा कारवाया करुन कायद्यांचा भंग केलेला असून शासनाने आता सदरच्या लोह खाणी तात्काळ रद्द करुन पाचवी अनुसूची, पेसा, वनहक्क आणि जैविक विविधता कायद्यांच्या तरतूदींचे पालन करावे अन्यथा मुंबई येथील आझाद मैदानावर शेतकरी कामगार पक्ष, अखिल भारतीय किसान सभा आणि विविध पारंपारिक इलाखे,व शेकडो ग्रामसभांच्या वतीने पारंपारिक वेशभूषेत आणि ढोल,मांजऱ्या,पाई सह अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे राज्य कौन्सिल सदस्य काॅ. अमोल मारकवार यांनी दिला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.