Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था, दि. ८ डिसेंबर :  तामिळनाडूतील कुन्नूर येथे भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून भीषण दुर्घटना घडली असून या दुर्घटनेत देशाचे संरक्षण दलप्रमुख जनरल बिपीन रावत गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून देशासाठी ही सर्वात धक्कादायक अशी घटना आहे. रावत यांचे निधन झाल्याच्या वृत्ताला भारतीय हवाईदलाने दुजोरा दिला आहे.

बिपीन रावत हे आज सकाळी ८.४७ वाजता दिल्ली विमानतळ येथून विशेष विमानाने सुलूर येथे पोहचले होते. तिथे ११.३४ वाजता पोहचल्यानंतर एमआय १७ या हवाईदलाच्या हेलिकॉप्टरने ते वेलिंग्टनकडे निघाले. वेलिंग्टन येथील स्टाफ कॉलेजमध्ये एक कार्यक्रम होता. त्यात ते लेक्चर देणार होते. मात्र, ११.४८ वाजता सुलूर येथून निघाल्यानंतर १२.२२ वाजता त्यांच्या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला आणि काही वेळातच हेलिकॉप्टर कोसळल्याचे वृत्त आले. या दुर्घटनेत रावत हे गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, काही वेळापूर्वीच त्यांच्या निधनाचे वृत्त आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भारतीय हवाई दलाने अधिकृत ट्वीटर हँडलवरून याबाबत माहिती दिली. तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचा समावेश आहे, असे हवाईदलाने नमूद केले आहे. दुर्घटनेत शौर्यचक्र विजेते भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे जखमी असून त्यांच्यावर वेलिंग्टन येथील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, बिपीन रावत यांच्या निधनाने देशावर मोठा आघात झाला आहे. २०२० मध्ये रावत यांच्याकडे संरक्षण दल प्रमुखपदाची धुरा देण्यात आली होती. ते देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख ठरले. त्यांच्या कार्यकाळात सर्जिकल स्ट्राइक ते ईशान्येतील ऑपरेशनपर्यंत अनेक मोठ्या मोहिमा फत्ते झाल्या. लष्करप्रमुखपदावर असतानाही त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाची ऑपरेशन्स झाली. रावत यांचा अपघाती मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला असून या दुर्घटनेच्या कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले गेले आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा  :

अचानक स्वच्छंद फिरतांंना आढळला वाघ… अन् जवळ असलेल्या लोकांना कळले नसल्याने उडाली तारांबळ

वाघाच्या दहशतीने शाळा महाविद्यालय बंद

 

 

Comments are closed.