Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास… त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पुणे डेस्क, ५ जानेवारी : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. सिंधुताई यांना दिनांक ४ जानेवारी रोजी पुण्याच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये सायंकाळी ८ वाजून १० मिनिटांनी हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्राप्त माहितीनुसार, सिंधुताई सपकाळ याचं हर्नियाचं ऑपरेशन झालं होतं. प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्याच्या गॅलक्सी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यान सिंधुताई यांची अखेर प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने हजारो अनाथ बालकांची माय हरपली आहे. सिंधुताई यांच्या निधनाची माहिती समजल्यानंतर रुग्णालयाबाहेर एकच गर्दी जमली.

सिंधुताई यांचे पार्थिव सकाळी ८ वाजेपासून मांजरी येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १२  वाजता ठोसर पागेत त्यांच्या पार्थिवावर दफनविधी करण्यात येईल. सिंधुताई महानुभाव पंथाच्या अनुयायी असल्याने त्यांच्या पार्थिवावर दफनविधी करण्यात येईल. तसेच सिंधुताईंना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सिंधुताई यांनी अनाथ बालकांसाठी १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती. त्यांनी लहान मुलांच्या शिक्षणापासून ते उज्ज्वल भविष्याची जबाबदारी घेतली. त्यादिशेने त्यांनी अनेक वर्ष काम केलं. त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून हजारपेक्षा जास्त बालकांचं पालकत्व निभावलं. त्याचबरोबर त्यांनी अशा अनेक संस्थांमधून अनाथ बालकांची जबाबदारी खांद्यावर घेतली.

सिंधुताई यांना त्यांच्या समाजकार्यासाठी गेल्यावर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तसेच महाराष्ट्र सरकारकडून त्यांना २०१२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रधान करण्यात आला होता. त्याआधी २०१० साली त्यांना महाराष्ट्र सरकारचा अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. अशाप्रकारे सिंधुताई यांना जवळपास ७५० आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

सिंधुताईंना श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली. सिंधुताईंच्या प्रयत्नांमुळे अनेक मुलांना चांगलं आयुष्य लाभलं, सिंधुताई त्यांच्या कार्यासाठी लक्षात राहतील असं म्हणत पंतप्रधान मोदींनी आदरांजली वाहिली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सिंधुताईंच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करणारं ट्वीट केलंय.

सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

“सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दु:ख व्यक्त केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, “ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनामुळे समाजातील अनाथांच्या डोक्यावर मायेचे मातृछत्र धरणारी माय हरपली आहे. समाजातील हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ करुन त्यांच्यावर मायेची पखरण करणाऱ्या सिंधुताईंच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे,” अशा शब्दांमध्ये सिंधुताईंना श्रद्धांजली अर्पण केलीय.

‘ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. अनाथ मुलांसाठी मायेची सावली धरणाऱ्या सिंधूताईंनी उभं केलेलं सामाजिक कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल,’ असं ट्वीट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे.

सिंधुताईंच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र पोरका झाल्याची भावना राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.

माईंच्या मोठ्या परिवाराच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त करीत यशोमती ठाकूर यांनी सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अनाथ मुलांना आधार देत त्यांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली वाहणारं ट्वीट केलं.

‘बाळ धनंजय, माईने समाजाला खूप दिलं, पण माईच्या संस्थेला सरकार म्हणून काहीतरी देणारा तूच रे पहिला…असं म्हणून माझ्या कार्याला अभिनव पोहोच पावती देणारी अनाथांची माय, पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त व्यथित करणारे आहे, असं ट्वीट सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

“देवा आम्हाला हसायला शिकव.. परंतु आम्ही कधी रडलोही होतो, याचा विसर पडू देऊ नकोस” असे महान विचार मागे सोडून वात्सल्यमूर्ती, थोर सामाजिक कार्यकर्त्या,अनाथांची माय,पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाची वार्ता मन सुन्न करणारी आहे.माईच्या अकाली निधनाने हजारो अनाथांची माय हरपली आहे. अस दुख: व्यक्त करीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  ट्वीट केलं आहे. 

 

हे देखील वाचा : 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना व सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्यास २८ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ – धनंजय मुंडे

व्याघ्र संरक्षणात सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील सर्व शाळांमध्ये ३ ते १२ जानेवारी दरम्यान ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियान

 

Comments are closed.