Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सुरजागड खाणीसंबंधात दलाली करणे बंद करा,सुरजागड पारंपरिक इलाक्यातर्फे खा.अशोक नेते यांचा निषेध

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि,२१ सप्टेंबर : एट्टापल्ली तालुक्यातील  सुरजागड प्रकल्प स्थानिक स्तरावर सुरू करावा, अन्यथा प्रकल्प गुंडाळा अशी भूमिका खा.अशोक नेते यांनी एट्टापल्ली येथील पत्रकार परिषदेत मांडली आहे. त्यांची भूमिका ही आमच्या स्थानिक शेकडो ग्रामसभांच्या विरोधात असून सुरजागड येथे केवळ खाण खोदून लोह दगडांची लुट करण्यात येणार आहे.मात्र प्रकल्प येथेच उभारा अशी मागणी करुन स्थानिक आदिवासी जनतेची दिशाभूल आणि कंपनीला अप्रत्यक्ष मदत करण्याचा खा.अशोक नेते नेहमीच जनविरोधी प्रयत्न करत असल्याने सुरजागड पारंपरिक ईलाका गोटुल समीतीतर्फे त्यांचा निषेध करण्यात येत आहे.

संविधानिक हक्क आणि अधिकारांवर गदा आणून आमचे जगण्याचे संसाधने नष्ट करु पाहणाऱ्या आणि संस्कृती, रितीरिवाज,प्रथा, परंपरांना हिरावू पाहणाऱ्या खाणींना आमच्या स्थानिक ग्रामसभा आणि आदिवासी जनतेकडून प्रखर विरोध होत असतांना केवळ दलालीपोटी होणारच नसलेल्या प्रकल्पाची खासदार, आमदार आणि राजकीय नेते मागणी करुन बेकायदा खाणींला उत्तेजना देण्यासाठी कंपनीला वारंवार मदत करुन जनतेशी विश्वास घात करीत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अशोक नेते हे बाहेर जिल्ह्यातून येवून आमदार आणि खासदार झाल्याने त्यांना येथील स्थानिक माडिया आदिवासींच्या जगण्याचे संसाधने आणि संस्कृती रितीरिवाज, प्रथा, परंपरा यांचेशी काहीही देणेघेणे नसल्याचे दिसून येत असून ते कदाचित बोगस आदिवासी असल्यानेच खाणीमुळे स्थानिक आदिवासी उध्वस्त झाले तरी चालतील पण कंपनीकडून त्यांना कमीशन मिळण्यासाठी खाण खोदल्या गेली पाहिजे, त्यासाठी प्रस्तावित नसलेल्या आणि शक्यता नसलेल्या प्रकल्पाचा ते नेहमी आग्रह करून लाॅयड्स मेटल्स ॲन्ड एनर्जी लिमिटेडची दलाली करण्याचा प्रयत्न करतात अशी टीकाही सुरजागड पारंपरिक इलाक्यातर्फे करण्यात आला आहे.

यापुढे जिल्ह्यातील कोणत्याही नेत्यांनी स्थानिक आदिवासी जनता आणि ग्रामसभांच्या ‘आम्हाला खदान नकोच’ या खदानविरोधी भुमिकेच्या विरोधात जावून विनाशकारी खदानीला पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रकल्प झाला पाहिजे, अशी मागणी करुन जनतेची दिशाभूल केली तर त्यांच्या घरांसमोर सुरजागड इलाख्यातील ७२ गावातील आदिवासी माडिया जनतेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल,असा इशाराही सुरजागड पारंपरिक इलाक्यातर्फे देण्यात आला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा,

 पत्नी व मुला मुलीची हत्या करून पतीनेच स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय

एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

शिक्षकानी विहरीत उडी घेऊन केली आत्महत्या

Comments are closed.