Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

१३ जणांचा बळी घेणारा नरभक्षक वाघ अखेर जेरबंद..

वन विभागासह नागरिकांनाही सोडला सुटकेचा निश्वास..!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

ओमप्रकाश चुनारकर , मनोज सातवी 

गडचिरोली १३ ऑक्टोबर :- गडचिरोलीसह चंद्रपूर आणि भंडारा या तीन जिल्ह्यातील तब्बल १३ जणांचा बळी घेणाऱ्या ‘सिटी – १’ या नरभक्षक वाघाला अखेर जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. या वाघाने १३ नागरिकांसह अनेक गुरांचा फडशा पडला होता त्यामुळे तिन्ही जिल्ह्यात या वाघाची मोठी दहशत निर्माण झाली होती.जवळपास आठवडाभरापासून वनविभागाची दोन पथके या वाघाच्या मागावर होती. अखेर आज (गुरुवारी) सकाळी वनविभागाने रचलेल्या सापळ्यात हा नरभक्षक वाघ अलगद अडकला तेव्हा त्याला बेशुध्द करून पकडण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या कारवाईने वन विभागासह नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला असून ही धाडसी कारवाई करणाऱ्या पथकाचे सर्व स्तराकडून कौतुक होत आहे.

CT 1 tiger

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गेल्या काही दिवसांपासून या नरभक्षक वाघाने गडचिरोली , चंद्रपूर तसेच भंडारा या जिल्ह्यांमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. एकामागे एक असे जवळपास १३ जणांचा नागरिकांचा बळी घेतला होता तर कित्येक पाळीव प्राण्यांना आपले भक्ष बनविले होते. त्यामुळे त्यामुळे नागरिकांमध्ये अतिशय दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच या नरभक्षक वाघाला जेरबंद कसे करायचे या चिंतेत वनविभागासह तिन्ही जिल्ह्यांचे प्रशासन होते.

‘सिटी – १’ या नरभक्षक वाघाने दोन दिवसापूर्वी देसाईगंज जवळच्या वळूमाता प्रक्षेत्रातील एका गाईवर हल्ला करून तिला ठार मारले होते. त्यामुळे हा वाघ त्या ठिकाणी पुन्हा येणार याची खात्री होती.त्यामुळे वनविभागाने ताडोबा येथून बोलावलेले पथक त्याच्यावर पाळत ठेवून होते. या पथकाने वाघासाठी एक सापळा रचून त्याला शिकार म्हणून (बेट) दुसरी एक गाय ठेवली होती. अखेर आज ‘सिटी १’ त्या सापळ्यात अडकल आणि टप्प्यात येताच शूटर टीमने त्याच्यावर बेशुद्धीचे इंजेक्शन (डार्ट) देऊन बेशुध्द केल्याची अशी माहिती वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी लोकस्पर्शला बोलताना माहिती दिली. या वाघाला आता पिंजऱ्यात बंद करून ठेवले जाणार आहे.

१३ जणांचा बळी घेणाऱ्या ‘सिटी – १’ या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे आर आर टी प्रमख, पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव)ता. अं. व्या. प्र. चंद्रपूर येथील डॉ. आर. एस. खोब्रागडे, पोलीस नाईक,(शुटर)ता. अं. व्या. प्र. चंद्रपूरचे  ए.सी.मराठे, तसेच आर.आर. टी.सदस्य बी. आर. दांडेकर, ए. एन. मोहुर्ले, एस. पी. नन्नावरे,  ए. डी. तिखट, यांच्यासह आर.आर. टी. वाहनचालक  ए. डी. कोरपे आणि  ए. एम. दांडेकर हे सहभागी झाले होते.

या घटनेची माहिती मिळताच वनसंरक्षक, गडचिरोली यांनी भेट देवून जेरबंद वाघाला गोरेवाडा येथे पाठविण्याबाबत प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तसेच क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प यांचेशी चर्चा करून कार्यवाही केली. CT-१ वाघाने डिसेंबर २०२१ पासून आतापर्यंत एकुण १३ लोकांचा बळी घेतल्यामुळे स्थानिक लोकांमध्ये या वाघाबद्दल प्रचंड रोष निर्माण हांवून लोकप्रतिनिधी व्दारे त्याला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी होत होती.

क्षेत्रीय स्तरावर गडचिरोलीचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, वडसा उपवनसंरक्षक श्री. धर्मवीर सालविठ्ठल, सहाय्यक वनसंरक्षक श्री. मनोज चव्हाण, श्री. धनंजय वायभासे, अविनाश मेश्राम, विजय धांडे, व त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी मागील ८ दिवसापासून अथक परिश्रम घेवून १३ नरबळी घेणाऱ्या CT-१ वाघाला जेरबंद करण्यात यश मिळविलेले आहे. याबद्दल श्री. महिप गुप्ता, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी सर्व टिम चे अभिनंदन केले आहे. या यशामुळे वाघांच्या हल्ल्यात मनुष्य बळी कमी होईल अशी अपेक्षा जनमानसात झाली आहे. CT- १ वाघाला जेरबंद केले तरी वडसा व गडचिरोली वनविभागामध्ये इतर वाघांचा वावर असल्यामुळे लोकांनी जंगलात जाण्याचे टाळावे असे आवाहन डॉ. किशोर मानकर, व श्री. धर्मवीर सालविठ्ठल, यांनी नागरीकांना केले आहे.

हे पण वाचा :-

 

Comments are closed.