Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नायगाव पूर्व आणि पश्चिमेला जोडणार्‍या नव्या उड्डाणपूलाचे शिवसेनेतर्फे स्व. धर्माजी पाटील असे नामकरण !

आता नवीन वादाला तोंड !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

वसई, दि. १४ ऑगस्ट : वसईच्या नायगाव पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या नव्या उड्डाणपुलाचे शिवसेनेच्या वतीने स्व.धर्माजी पाटील असे नामकरण करण्यात आले. या पूलाचे कुठलेही अधिकृत नाव ठरले नसताना, कोणत्याही प्रकारची शासकीय परवानगी नसताना एमएमआरडीए व पोलीस प्रशासनाने हिरवा कंदील दाखवला नसतांना हा नामांतराचा कार्यक्रम पार पडला. यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे.

गेल्या ९ वर्षांपासून वादात सापडलेल्या या पुलाचे काम अखेर पूर्ण झाले. मुंबई महानगर विकास प्राधिकरण तर्फे नायगाव पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा १.२९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपुल तयार केला आहे. पूल तयार होऊन सुद्धा या पुलाला कुणाचे नाव द्यावे हा कळीचा मुद्धा होता. त्यामुळे अद्यापपर्यंत त्याचे अधिकृत उद्घाटन करण्यात आलेले नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शिवसेनेने या पुलासाठी स्व. धर्माजी पाटील , काँग्रेस पक्षातर्फे मायकल फुट्यार्डो, तर भारतीय जनता पार्टी तर्फे स्व. खासदार चिंतामण वनगा यांच्यासह इतर सामाजिक संस्थांनीही विविध नावांची मागणी केली होती. दरम्यान, शिवसेनेने मात्र आज या उड्डाणपुलाला स्थानिक नेते धर्माजी पाटील यांचे नाव देण्याचा जाहीर कार्यक्रम आयोजित केला होता. काहीही झाले तरी चालेल परंतु पुलाला स्व. धर्माजी पाटील यांचे नाव लागले पाहिजे, अशी भूमिका शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती. मात्र हे नामकरण बेकायदेशीर असून त्याला कसलीच परवानगी नव्हती. असा कार्यक्रम झाल्यास गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. मात्र तरी देखील आज सकाळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जमून स्व. धर्माजी पाटील असे या पुलाचे नामकरण केले. पुलाच्या दोन्ही बाजूस धर्माजी पाटील यांच्या नावाच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत.

कोणतीही शासकीय परवानगी नसतानाही शिवसेनेने पोलीस व एमएमआरडीए यांच्या परवानगी शिवाय नामांतराचा कार्यक्रम आटोपून घेतला. आता या नामांतरामुळे पुढे काय होणार ? अशी कुजबुज नागरिकांत सुरू आहे. या सर्व प्रकरणी पोलीस काय भूमिका घेणार असे आता विचारले जाऊ लागले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

गडचिरोली पोलीस दलास मिळाले 42 पोलीस शौर्य पदक व 02 गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पोलीस पदक.

Comments are closed.