Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अखेर अनिल देशमुख यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी केला मंजूर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. ५ एप्रिल: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असल्याने अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर नैतिकदृष्ट्या या पदावर राहणे योग्य वाटत नाही, असं देशमुख यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ हा राजीनामा मंजूर केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नैतिकतेतून राजीनामा

सीबीआयची चौकशी चालू असताना पदावर राहणं योग्य नसल्याचं सांगून देशमुख यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गृहमंत्रीपद मुख्यमंत्र्यांकडे

देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर गृहमंत्रीपदाची सूत्रे मुख्यमंत्र्यांकडे राहणार आहे. नव्या गृहमंत्र्याबाबत शरद पवार निर्णय घेतील, असंही त्यांनी सांगितलं.

काय आहे प्रकरण

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे व अन्य एका अधिकाऱ्याला महिन्याला १०० कोटी रुपये वसुलीचे आदेश दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. मात्र, सचिन वाझे प्रकरणात बदलीची कारवाई झाल्यानं आकसातून सिंग यांनी हे आरोप केल्याची भूमिका सरकारनं घेतली होती. तसंच, सिंग यांनी दबावाखाली येऊन हे आरोप केल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर सिंग यांनी उच्च न्यायालयात धाव घेत, देशमुख यांच्यावर आपण केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. त्यावर निर्णय देताना कोर्टाने आज सीबीआय चौकशीचे निर्देश दिले. ‘हे अभूतपूर्व प्रकरण आहे. खुद्द मुंबई पोलिस आयुक्तांनीच गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे सत्य बाहेर येणे आवश्यक असल्याने आम्ही प्राथमिक चौकशीचा आदेश देत आहोत,’ असं न्यायालयानं नमूद केलं होतं.

न्यायालयाच्या या निर्णयानंतर अनिल देशमुख यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या पदाचा व घराण्याचा मान राखत कारवाई करावी, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं.


Comments are closed.