Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विजयी भव:पंखात बळ दिले आहे जिंकण्याची जिद्द ठेवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा छात्रसैनिकांना मंत्र

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क दि.१४:- तुमच्या पंखांमध्ये शिक्षक, मार्गदर्शकांनी बळ दिले आहे. आता जिंकण्याची जिद्द ठेऊन भरारी घ्या, असे आवाहन करतानाचा विजयी भव: चा मंत्रही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय छात्रसेनेच्या सैनिकांना दिला.
भारताच्या प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीतील राजपथावरील ध्वजसंचलना मध्ये सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या चमूला प्रोत्साहन आणि शुभेच्छा देतांना मुख्यमंत्री श्री.ठाकरे बोलत होते. दुरदृश्यप्रणालीद्वारे त्यांनी दिल्ली येथे शिबीरात सहभागी छात्र सैनिकांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रसैनिकातूनच पुढे काही देशाच्या रक्षणासाठी सज्ज होतात. तेव्हा मात्र ज्यांना तीळगुळाची भाषा समजत नाही त्यांना सडेतोड भाषेत उत्तर द्यावे लागेल. आणि हे माझ्या छात्रसैनिकांनी नक्कीच माहित आहे. भारतात सैनिकी शिक्षण सक्तीचे नाही. तरीही राष्ट्रीय छात्र सेना हे जगातील एक मोठे छात्रसेना संघटन आहे. कित्येकदा आपल्या पाल्यांने मात्र नीटनेटके आणि चाकेरीबद्ध आयुष्य जगावे, असे अनेक पालकांना वाटते. अशा परिस्थितीतही आपल्या पाल्यांना छात्र सेनेत सहभागी होण्याच्या स्वप्नांना बळ देणाऱ्यां पालकांना मुजरा करतो.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील संचलनात तुम्हाला संपूर्ण जग बघणार आहे. तेव्हा आपल्या महाराष्ट्राचा पहिला क्रमांक यावा, याच जिद्दीने तुम्ही पाऊल टाकावे. प्रतिवर्षीप्रमाणे दिल्ली गाजवून विजयी भव: असा मंत्र यावेळी मुख्यमंत्र्यांनी छात्रसैनिकांना दिला.
दुरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रीय छात्रसेनेचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय. पी. खंडुरी, संचालक कर्नल सतपाल सिंह आणि दिल्ली येथे प्रशिक्षण शिबीरातील राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

ठाकरे यांनी राष्ट्रीय छात्रसेनेच्या सैनिकांना

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा


नवी दिल्लीत दरवर्षी राष्ट्रीय छात्र सेनेचे दरवर्षी प्रजासत्ताक दिन शिबीर आयोजित केले जाते. यात देशभरातील सर्व राज्यांच्या छात्रसेनेचे चमू येतात. या चमूतून सर्वोत्कृष्ट अशा छात्रसैनिकांची निवड करून प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होणाऱे पथक तयार केले जाते. यंदाच्या या पथकात महाराष्ट्राच्या सर्वाधिक छात्रसैनिकांची निवड झाली आहे. प्रजासत्ताक दिनानंतर २८ जानेवारी रोजी पंतप्रधान रॅली म्हणून (PM Rally) छात्रसैनिकांच्या विविध राज्यांच्या चमूंची स्पर्धा आयोजित केली जाते. यातील विजेत्या संघाला पंतप्रधान पीएम बॅनर (PM Banner) प्रदान करतात. या स्पर्धेतही महाराष्ट्राच्या चमुने यापुर्वीही चमकदार अशी कामगिरी केली आहे.

Comments are closed.