Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंडवाना विद्यापीठाच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षणातून उघडले स्वयंरोजगाराचे नवे दालन

गोंडवाना विद्यापीठाच्या पुढाकार...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, दि 5 : आजच्या जागतिकीकरणाच्या युगात औद्योगिकीकरणावर भर देत कुशल व्यावसायिकांची मागणी वाढत आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी कौशल्यावर आधारित शिक्षणाची अत्यंत गरज आहे. विद्यार्थी त्यांच्या शैक्षणिक आणि पदवीधर कार्यक्रमादरम्यान ज्ञान मिळवत असतांना, खरे आव्हान रोजगारक्षम कौशल्यांच्या अभावामध्ये आहे. उत्पादकता वाढविण्यासाठी विविध क्षेत्रांना विशिष्ट कौशल्ये आवश्यक असतात. त्यामुळे कौशल्य-आधारित, व्यावसायिक प्रशिक्षण तरुणांना रोजगारक्षम बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून येथील तरुण-तरुणींसाठी स्वयंरोजगाराचे नवे दालन उघडले आहे.

कौशल्य-आधारित, व्यावसायिक प्रशिक्षण विशिष्ट कौशल्य विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करते जे विद्यार्थ्यांना अधिक रोजगारक्षम आणि बाजारपेठेतील मागणी लक्षात घेवून प्रशिक्षण देते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने, विद्यार्थी कल्याणासाठी व रोजगार निर्मीतीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे. कौशल्याधारित आणि व्यावसायिक प्रशिक्षणाची वाढती मागणी लक्षात घेता गोंडवाना विद्यापीठ व गडचिरोली, जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे आणि तत्कालीन जिल्हाधिकारी संजय मीना यांच्या संकल्पनेतून गोंडवाना विद्यापीठ परीसरात अल्फा अकॅडमी हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला.

अल्फा अकॅडमीच्या माध्यमातून आजतागायत 500 प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना संगणकीय कोडींगचे प्रशिक्षण देण्यात आले. विशेष म्हणजे, 233 विद्यार्थ्यांनी नॅस्कॉम ही प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली असून त्यापैकी 150 विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप पुर्ण केली आहे. तर प्रशिक्षणाच्या माध्यमातून 45 विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त झाला असून जिल्हा प्रशासनाने अल्फा अकॅडमीतील 12 प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची निवड देखील केली आहे. ही विद्यापीठाच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कोडींग प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध संस्थांना वेबसाईट तयार करून दिल्या असून विद्यार्थी मोठे अर्थार्जन प्राप्त करीत आहे. ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. तसेच C++, HTML, CSS, JS, सॉफ्ट स्किल ट्रेनिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध संगणकीय कोडींगचे धडे मिळतील आणि विद्यार्थी स्वतः वेबसाईट तयार करू शकतील.

त्यासोबतच, जिल्हयातील विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील तांत्रिक प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने विद्यापीठ परीसरात सी.आय.आय.आय.टी (CIIIT) प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली. सदर प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते 15 नोव्हेंबर 2023 रोजी पार पडले. सदर केंद्रामध्ये वार्षिक 1000 विद्यार्थ्यांना तांत्रिक प्रशिक्षण देण्याचे मानस असून सदर प्रशिक्षण इंडस्ट्री 4.0 या तंत्रज्ञानावर आधारित असेल. सी.आय.आय.आय.टी (CIIIT) केंद्रात प्रशिक्षणासाठी 9 विभागातील विविध 18 कोर्सेस सुरू आहेत. यामध्ये, ऑटोमोबाईल सेक्टर, IOT, डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग, ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग इनोव्हेशन डिझाईन, मॅन्युफॅक्चरिंग एक्झिक्युशन सिस्टीम आदी क्षेत्रातील विविध कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठातील आदर्श पदवी महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन देखील नुकतेच करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांचा शोध घेणे व त्यांचे नवउद्योजकतेचे स्वप्न साकार करणे व योग्य पाठबळ पुरविण्यासाठी (TRICEF) ट्रायसेफ नवसंशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. केवळ नोकरीवर अवलंबून न राहता युवकांनी स्वयंरोजगार निर्माण करावा, त्यांना स्वावलंबी होता यावे यासाठी गोंडवाना विद्यापीठ संचलीत ट्रायसेफचे कार्य सुरु आहे.

शिक्षणातून नोकरी व उद्योजकता वाढीस लागणे आणि येथील आदिवासी समाजाचा आर्थिक स्तर वाढविणे हा प्रशिक्षणाचा उद्देश आहे. बदलत्या काळात फक्त पारंपारिक शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व त्यांचे भावी जीवन सुखकर करण्यास पुरेसे नाही. त्यामुळे डिजिटल कौशल्यावर आधारित शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. नियमित अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांनी वेगवेगळी कौशल्ये आत्मसात केली तर त्याचा निश्चितच फायदा होईल.

हे देखील वाचा,

महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा खा.अशोक नेते यांच्या प्रचारार्थ प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Comments are closed.