Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

माध्यमांतील आरोग्य प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद: मुख्यमंत्र्यांनी केले महत्त्वाचे आवाहन

कोरोनाबाबत वस्तुनिष्ठ माहिती देतानाच माध्यमांनी जनजागृती करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. ८ एप्रिल: राज्यातील कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने केलेली नियमावली, उपाययोजना यांची वस्तुनिष्ठ माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवितानाच माध्यमांनी जनजागृती करावी. साथीच्या आजाराचा मुकाबला करण्यसाठी सर्वांनी एकत्र येऊन हा लढा यशस्वी करूया असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

विविध माध्यमांमध्ये आरोग्य विषयक पत्रकारीता करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींशी आज मुख्यमंत्र्यांनी दृरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी आदी उपस्थित होते.

यावेळी माध्यम प्रतिनिधींनी कोरोना नियंत्रणाबाबत, आरोग्य व्यवस्था, औषधांची उपलब्धता, कोरोना चाचण्या, लसीकरण आदी विविध मुद्द्यांवर अनुभव कथन करतानाच काही सूचनाही केल्या. त्या सूचनांचे स्वागत करतानाच हा संवाद यापुढेही कायम ठेवण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

नियमावलीची माहिती सोप्या भाषेत द्यावी

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वाधिक रुग्णवाढ महाराष्ट्रात होत आहे. ही रुग्णवाढ थांबविण्यासाठी राज्य शासन अनेक उपाय योजना करीत आहे. नियमावली जाहीर केली आहे. लोकांना त्याविषयी सोप्या भाषेत माहिती देताना कोरोना नियंत्रणासाठी अनावश्यक गर्दी टाळणे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे या सुचनांचे पालन करणे किती आवश्यक आहे हे समजून सांगायची आवश्यकता आहे. माध्यमांनी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

कोरोना विरुद्धच्या लढ्यात माध्यमांचा सूचनात्मक सहभाग असावा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कोरोना विरुद्धची लढाई एकट्या शासनाची नसून त्यात सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे. कोरोना विरुद्धच्या या लढ्यात उपाययोजना, नियमावलींमध्ये सुधारणा व्हावी यासाठी माध्यमांचा सूचनात्मक सहभाग असावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लसीकरणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोस नंतर किती जणांना पुन्हा कोरोनाची बाधा झाली याविषयी अभ्यास करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला केल्या. राज्यातील नागरिकांना प्रबोधनातून दिलासा देतानाच कोरोनाला रोखण्यासाठी एकत्र येवूया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

शासकीय आरोग्य संस्थांमधील नेत्रोपचार विभाग बंद राहणार नाही

कोरोना रोखण्यासाठी शासन करीत असलेल्या उपाययोजनांबाबत लोकमन तयार करण्याच काम माध्यम प्रतिनीधींनी करावे, असे सांगतानाच कोरोनाकाळात राज्यातील शासकीय आरोग्य संस्थांमधील मोतीबिंदू शस्त्रक्रिया, नेत्रउपचार विभाग बंद राहणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी दिली. राज्य कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात आघाडीवर असून त्याला वेग येण्यासाठी महाराष्ट्राला दर आठवड्याला ४० लाख डोसेस देण्याची आग्रही मागणी केंद्र शासनाकडे केल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

रेमडीसीवीर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांशी चर्चा करणार असून एमआरपीचा आधार घेऊन विक्रेते जास्त किंमतीने त्याची विक्री करणार नाही यासाठी उपाययोजना करण्याची सूचना केल्याचे त्यांनी सांगितले.

रुग्णांना बेड मिळवून देणारा मुंबई महापालिका पॅटर्न राज्यभर

कोरोना रुग्णांना रुग्णालयातील बेड उपलब्ध करून देणारी मध्यवर्ती यंत्रणा मुंबई महापालिकेने तयार केली असून त्यामुळे रुग्णांना बेड मिळण्यासाठी सुविधा निर्माण झाली आहे. राज्यभर अशाचप्रकारे यंत्रणा निर्माण व्हावी यासाठी मुंबई महापालिका पॅटर्न सर्वत्र राबविण्याचे निर्णय झाल्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यावेळी सांगितले. आज सकाली राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस अधीक्षकांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आढावा घेतल्याचे सांगतानाच जिल्हा यंत्रणेने कोरोना नियमांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश दिल्याचे मुख्य सचिवांनी सांगितले.

यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सादरीकरण करतांना राज्यातील कोरोना रुग्णस्थिती आणि आरोग्य सुविधांची माहिती दिली. यावेळी पत्रकार संदीप आचार्य, सुमित्रा देब रॉय, तबस्सुम बर्नगरवाला, शर्मिला कलगुटकर, भाग्यश्री भुवड, सुरज पांडे, स्वप्नील मिश्रा यांनी मनोगत व्यक्त केले.

Comments are closed.