Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वृक्ष स्थानांतरणासाठी कंत्राटदारांनी नवीन तंत्रज्ञान विकसित करावे – मंत्री नितीन गडकरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर, 20 जानेवारी : महामार्ग बांधकाम क्षेत्रातील कंत्राटदारांनी रस्ते बांधकाम करताना बांधकामात येणारे मोठे वृक्ष स्थानांतरण करून पुन्हा यशस्वी लागवड कसे करता येतील, यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करावे. तसेच अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘रोड इंजिनीअरिंग’मध्येच प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा समावेश करावा, अशा सूचना केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केल्या.‘इन्फ्रा बिल्ड इंडिया’च्या पदाधिकार्‍यांशी गडकरी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधताना बोलत होते.

महामार्ग बांधकाम करताना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्यांचा दर्जा उत्तम ठेवून खर्चात बचत करणे शक्य आहे. जेसीबीमध्ये डिझेलऐवजी सीएनजी वापरा, यामुळे इंधन खर्चात 50 टक्के बचत होईल. तसेच रस्त्यांसाठी लागणारी माती, दगड, मुरुम बुलडाणा पॅटर्नप्रमाणे नदी नाल्यांचे खोलीकरण करून घ्या आणि रस्त्यांसाठी वापरा. यातूनचही खर्चात बचत होईल आणि जलसंधारणाचा उद्देश साध्य होईल. जलसंधारण आज देशासाठी अत्यंत आवश्यक आहे. ज्या कंत्राटदाराला जगातील नवीन तंत्रज्ञान वापरायचे असल्यास त्याने वापरावे व खर्चात बचत करावी, असेही ते म्हणाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

देशात 5 लाख अपघातांमध्ये दीड लाख लोक मृत्युमुखी पडले असून अपघातांवर नियंत्रण मिळवून लोकांचे जीवन वाचविण्यास आपले प्राधान्य असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- रोड इंजिनिअरिंग करतानाच अपघात होणार नाहीत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कंत्राटदारांनी कराव्या. रस्ते अपघात कमी करणे आणि वृक्षारोपण आणि वृक्ष स्थानांतरण या बाबी कंत्राटदारांनी गांभीर्याने घ्याव्यात. रस्ते बांधकाम क्षेत्राला अधिक चालना मिळावी म्हणून शासनाने योग्य धोरण आखून या क्षेत्राला सहकार्य केले आहे. या क्षेत्रात 100 टक्के परकीय गुंतवणुकीसही शासनाने मान्यता दिली आहे. हे करीत असताना बांधकामाच्या दर्जाशी कोणताही समझोता न करता व वेळेत काम पूर्ण करण्याची जबाबदारी कंत्राटदारांची असल्याचेही त्यांनी सांगितले.

Comments are closed.