Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वनहक्क पट्टे मिळाले आता कृषी व बँकांच्या विविध योजनेतून आधुनिक शेतीला चालना द्या – विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे- वर्मा

वन हक्क वाटप प्रमाणपत्राचे वितरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 25 सप्टेंबर : वनहक्क पट्टे मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासनाबरोबर संवाद साधून कृषी योजना तसेच बँकांची मदत घेवून शेतीला आधुनिकतेची जोड द्या असे आवाहन नागपूर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी केले. गडचिरोली जिल्ह्यातील वनहक्क पट्टे धारक शेतकऱ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करताना त्या बोलत होत्या. आधुनिक शेतीला एकाने सुरुवात केली तर ते पाहून इतरही शेतकरी पुढे येतील व यानंतर अजून गावे जोडली जातील. वनहक्क मिळाले आता विविध योजनांची जोड देवून मिळालेल्या संधीचा चांगला विनीयोग करा यातून निश्चितच आपले अर्थिक उत्पन्न वाढेल असे ते यावेळी म्हणाल्या.

गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्या बहुसंख्येने वसलेली आहे. गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील वन, नदी नाल्यांनी वेढलेल्या निसर्गरम्य वातावरण असलेला हा जिल्हा आहे. स्थानिकांचा मुळ व्यवसाय हा शेती असून आदिवासी व इतर जमातींना उदरनिर्वाह होण्याचे दृष्टीने शासनाने अनुसूचित जमाती आणि इतर पारंपारिक वननिवासी “वनहक्क” कायदा 2006 अस्तीत्वात आणला. त्याचाच भाग म्हणून या कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम व मागास भागातील वनहक्क पात्र दावेदारांना त्यांच्या हक्कांची जमीन मिळावी म्हणून जिल्हास्तरीय वनहक्क समिती मार्फतीने वनहक्क प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रातिनिधीक स्वरूपात 12 जणांना वनहक्क दावे वाटप केले. यामध्ये एटापल्ली तालुक्यातील 7 जणांना वनहक्क प्रमाणपत्राचे वाटप केले तर आरमोरी तालुक्यातील 5 जणांना वनहक्क प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी संजय मिणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, उपवनसंरक्षक कुमारस्वामी उपस्थित होते. यावेळी उपस्थित लाभार्थी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. आता आम्ही जास्त मेहतीने शेती करुन उत्पादन वाढवू असा विश्वास उपस्थितांना दिला. यावेळी सुत्रसंचलन श्री दहिकर यांनी केले.

अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम 2006 व नियम 2008, सुधारणा नियम 2012 अंतर्गत वैयक्तिक दाव्यांचा अहवालानुसार वैयक्तिक वनहक्क दावे एकूण मंजूर (अपीलासह) 31795 आहेत. त्यापैकी अनु.जमाती 17129, इतर पारंपारीक 14666 असून एकूण क्षेत्र (हेक्टर मध्ये) 37,740.17 असे आहे. तसेच सामुहिक दाव्यांमध्ये जिल्हास्तरीय समितीने मान्य केलेले वन दावे एकूण 1422 आहेत. त्यांचे एकूण क्षेत्र हे 5,03,322.11 हे. आर. आहे.

विभागीय स्तरावरील वनहक्क सुनावणी- जिल्ह्यातील वनहक्क मागणी केल्यानंतर नामंजूर दावे अपीलात गेलेल्या दाव्यांवरती विभागीय स्तरावर सुनावणी होते. यानूसार जिल्ह्यातील दुर्गम भागातील अपील धारकांना उपस्थित राहता यावे म्हणून गडचिरोलीमध्ये विभागीय स्तरावरील सुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे- वर्मा यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे सर्व उपस्थितांची सुनावणी घेतली यावेळी विभागीय वनहक्क समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते.

Comments are closed.